बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ८० टक्के रोजगार भूमिपुत्रांना : सुभाष देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:34 PM2018-10-06T17:34:24+5:302018-10-06T17:39:06+5:30
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले.
कोल्हापूर : मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यासाठी उद्योगांना बळ देण्याचे काम सुरू असून या क्षेत्रात ८० टक्के रोजगार स्थानिक भूमिपुत्रांना देणे ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी येथे केले; तर याच कार्यक्रमात कौशल्य विकासासाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटींची तरतूद केल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
उद्योग विभागातर्फे पेटाळा येथील पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या आवारात आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. प्रमुख उपस्थिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, उद्योग सहसंचालक व्ही. एल. राजाळे, आदींची होती.
उद्योगमंत्री देसाई म्हणाले, उद्योगक्षेत्रात गेल्या साडेचार वर्षांत आमूलाग्र सुधारणा आणि बदल करण्यात आले आहेत. उद्योजकांना यापूर्वी घ्याव्या लागणाऱ्या सुमारे ७५ परवानग्यांची संख्या कमी करून ती आता केवळ १० ते १५ वर आणली आहे. त्याबरोबरच उद्योगघटकांना पायाभूत सुविधा आणि सवलती देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला असून, आतापर्यंत पुणे, ठाणे, नाशिक या ठिकाणी झालेल्या मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर येथील मेळाव्यातूनही अनेक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
पालकमंत्री पाटील म्हणाले, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व जिल्ह्यांत कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य दिले आहे. कौशल्य विकासाला अधिक व्यापकता देण्याच्या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीतून यासाठी एक कोटीची तरतूद करण्याचा मानस आहे. तसेच नवउद्योजकांना भाग भांडवलासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यावर शासनाने भर दिला आहे.
आमदार क्षीरसागर म्हणाले, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.