शिरोळ पालिकेसाठी चुरशीने ८० टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 01:15 AM2018-10-22T01:15:40+5:302018-10-22T01:15:44+5:30
शिरोळ : शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ७९.९१ टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ किरकोळ शाब्दिक ...
शिरोळ : शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ७९.९१ टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली़ कोणताही अनुचित प्रकार घडला नाही़ एकूण नगरसेवक पदाच्या १७ जागेसाठी ८३ उमेदवारांचे, तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले़ आज, सोमवारी मतमोजणी होणार असून, निकालानंतर शिरोळची सत्ता कुणाकडे हे स्पष्ट होणार आहे़ पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या निकालाकडे उत्सुकता लागून राहिली आहे.
‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी, आमदार उल्हास पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत चौरंगी लढत झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पाशा पटेल, शिवसेनेचे लक्ष्मण वडले या दिग्गजांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत रंगत आली.
येथील पालिकेच्या नगरसेवक पदाच्या १७, तर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी रविवारी सकाळी साडेसात वाजता ३० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी नऊनंतर मतदानाला वेग आला. अनेकांनी सकाळी आणि संध्याकाळच्या सत्रात मतदान केले. मतदानाच्या अखेरच्या दीड तासात मतदानाला मतदारांनी गर्दी केली होती़ प्रभाग आठ व तीनमध्ये मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड वगळता मतदान शांततेत पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, प्रशासक तथा तहसीलदार गजानन गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.
साडेअकरा वाजेपर्यंत फटाके फुटणार...
मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात आज, सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. आठ टेबलांवर मतमोजणी होणार आहे़ एकाचवेळी आठ प्रभागांतील मतमोजणाी होणार असून, नगराध्यक्ष पदाचा निकाल शेवटी जाहीर होणार आहे. त्यामुळे सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे.
मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर
शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चौरंगी सामना झाल्यामुळे ८० टक्क्यांपर्यंत मतदान झाले. भाजपसह अन्य तीन आघाड्यांनी विजयाचा दावा केला आहे. चुरशीने ८० टक्के मतदान झाले असले तरी वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे आज, सोमवारी सकाळी स्पष्ट होणार आहे.
नगराध्यक्ष पदाचा गुलाल कोणाला
शिरोळ पालिकेची निवडणूक नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरून गाजली. भाजप, शाहू, ताराराणी व बहुजन आघाडीच्या नेत्यांनी नगराध्यक्ष पदाची ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. प्रचार काळात अनेक आरोप-प्रत्यारोपाचे मुद्दे गाजले. यामुळे नगराध्यक्ष पदाचा दावेदार कोण ठरणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.