८०% सांडपाणी रोखले; कोल्हापूर महापालिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:28 AM2018-07-04T00:28:55+5:302018-07-04T00:29:05+5:30
कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला प्रमुख कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे नदीमध्ये मिसळणारे बऱ्यापैकी सांडपाणी रोखण्यात यश मिळविले असून, शहरातील जवळपास ८० टक्के मैलामिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा केला आहे. उर्वरित २० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याकरिता दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील दुधाळी नाला थेट नदीत मिसळत होता. जयंती नालासुद्धा वारंवार ओसंडून वाहत नदीत मिसळत होता; परंतु हे चित्र सुधारण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. विशेष म्हणजे या सर्व कामास निधीची कमतरता नाही, तर वेळोवेळी कामे करणाºया ठेकेदारांच्या मनमानीमुळे कामे रेंगाळली आहेत. सोमवारी (दि. २) पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रशासनाला फैलावर घेतल्यानंतर यंत्रणेला जाग आली आहे.
पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत गेल्या काही वर्षांपासून राष्टÑीय हरित लवादासमोर सुनावणी सुरू असल्याने प्रत्येक महिन्याला झालेल्या कामाचा अहवाल द्यावा लागतो. त्यामुळे सांडपाणी प्रक्रियेबाबत बरीच प्रगती झाली आहे. सध्या बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यावरील सांडपाणी उपसा केंद्र, तसेच अन्य दोन एस.टी.पी. केंद्रांची कामे गतीने सुरू आहेत. मात्र, अद्यापही शहरातील सात छोटे नाले अडवून ते एस.टी.पी.कडे वळविण्याची कामे बाकी आहेत. त्यासाठी निविदा मागविण्यात आलेल्या असून, हे काम पुढील दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
महापालिका यापुढे
काय करणार आहे?
बापट कॅम्प येथील नाला अडवून तो एस.टी.पी. केंद्राकडे वळविणार. सिव्हिल काम पूर्ण, पंपिंग मशिनरी बसविण्याचे काम सुरू.
लाईन बझार येथील नाला एस.टी.पी.कडे वळविणार. मॅकेनिकल काम पूर्ण, पंपिंग मशिनरी बसविण्याचे काम सुरू.
दुधाळी गवत मंडईजवळील सहा एमएलडी क्षमतेच्या एस. टी.पी.चे काम होण्यास प्राधान्य.
कसबा बावडा येथील चार एमएलडी क्षमतेच्या एस. टी.पी.च्या कामास प्राधान्य.
शहरातील सात छोटे नाले अडवून वळविणे या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून, लवकरच कामाला सुरुवात.
दुधाळी झोनमध्ये ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामास प्राधान्य देणार
महापालिकेला आलेल्या अडचणी
दुधाळी एस.टी.पी. उभा करण्यात ठेकेदाराकडून विलंब.
दुधाळी केंद्राला विद्युत पुरवठाही उशिरा सुरू झाला.
बापट कॅम्प व लाईन बझार नाला अडविण्याचे काम मूळ ठेकेदाराने सोडले. उर्वरित काम दुसºया ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतले.
सात नाले वळविण्याच्या कामास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. फेरनिविदा काढाव्या लागत आहेत.