बदलीसाठी ८० शिक्षकांनी दिली खोटी माहिती -आॅनलाईन प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 01:03 AM2018-07-24T01:03:45+5:302018-07-24T01:05:41+5:30
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : ‘सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी’ यासाठी आॅनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर जिल्ह्यातील ८० शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक शिक्षक, शिक्षिका हातकणंगले तालुक्यातील आहे. बाराही तालुक्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या छाननीमध्ये ही बाब उघडकीस आली आहे. यातील सर्व खोटेपणाचा अभ्यास करून ज्यांनी खरोखरच गंभीर अशी खोटी माहिती दिली आहे अशा शिक्षकांच्या पुन्हा बदल्या करण्यात येणार आहेत तसेच काहीजणांविरोधात शिस्तभंगाचीही कारवाई करण्यात येणार आहे.
यंदा पहिल्यांदाच झालेल्या आॅनलाईन बदल्यांमध्ये गंभीर आजाराने आजारी असलेल्या शिक्षकांचा ‘संवर्ग १’ मध्ये समावेश होतो. दुसºया संवर्गामध्ये ‘पती-पत्नी सोय’ हा घटक येतो. तिसºया संवर्गामध्ये ‘सुगम-दुर्गम शाळा’ हा प्रकार येत असून चौथ्या प्रकारामध्ये बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांनी आपली मूळ नियुक्ती तारीख लिहून सेवाज्येष्ठतेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
काही शिक्षकांनी चुकीच्या पद्धतीने अपंग आणि आजारपणाचे दाखले घेतले आहेत तर काहींनी पती-पत्नी एकत्रिकरण नियमाचा फायदा घेण्यासाठी काही घोटाळे केले आहेत. हे सर्व प्रकार निदर्शनास आले आहेत. त्यातील दोषी आढळलेल्या ३७ शिक्षक शिक्षिकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ‘कारणे दाखवा नोटिसा’ बजावल्या होत्या.
तसेच गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकाºयांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून सर्वच बदली झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार छाननी केली असता ८० शिक्षकांना चुकीची माहिती भरल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व शिक्षकांची कागदपत्रे शिक्षण विभागाकडे जमा करण्यात आली आहेत.
खोेटे अंतर, खोटा आजार
काहींनी नसलेला आजार आपल्याला किंवा मुलाला झाल्याचे सर्टिफिकेट घेतले आहे तर काहींनी अंतर दाखवताना जवळचे दाखवण्याऐवजी एस. टी. ज्या मार्गाने जाते तो मार्ग दाखवला आहे. काहींनी शाळा दुर्गम नसताना ती दाखवली आहे. अशा अनेक पद्धतीने शिक्षक, शिक्षिकांनी एकतर बदली सोयीची होण्यासाठी किंवा गैरसोयीची होऊ नये यासाठी हा कारभार केल्याचे स्पष्ट झाले आहे.