ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यात विविध मार्गावरील ८०० फेऱ्या रद्द, संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार ?
By सचिन यादव | Published: September 4, 2024 06:16 PM2024-09-04T18:16:38+5:302024-09-04T18:17:09+5:30
दोन दिवसांत सुमारे 'इतक्या' लाखांचे नुकसान
कोल्हापूर : एसटी कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फटका दुसर्या दिवशीही बसला. मध्यवर्ती बसस्थानक, रंकाळा, संभाजीनगर सह जिल्ह्यातील बारा आगारातून तुरळक वाहतूक सुरु राहिली. दोन दिवसांत सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. विविध मार्गावरील ८०० फेर्या रद्द करण्यात आल्या. ५० हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास थांबला. संपामुळे मुंबई आणि पुणे मार्गावरील बसेस उपलब्ध होत्या, मात्र प्रवासी नसल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकात होते. जिल्ह्यातील अन्य मार्गावरील वाहतूक सुरु राहिली.
विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. त्याचा फटका बारा आगारातील प्रवाशांना बसला. त्यासह एसटी प्रशासनाला आर्थिक फटका बसला. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकासह बारा आगारातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. मंगळवारी पहाटेपासून सीबीएसमध्ये तुरळक वाहतूक सुरु राहिली. पुणे, मुंबई, पाटण, कराड, चिपळूण, महाड, जोतिबा, कोडोली, वाई, फलटण या मार्गावर एसटी बसेस फलाटवर थांबून होत्या. मात्र त्या मार्गावर प्रवासी नसल्याचे चित्र होते.
जिल्ह्यातील अन्य आगारात मात्र तुरळक वाहतूक सुरु राहिली. दररोज जिल्ह्यातील १२ आगारातून ८५२ एसटी बसेस धावतात. दुपारपर्यंत केवळ ३५० एसटी धावली. परराज्यातूून आलेल्या काही एसटीतून प्रवासी वाहतूक सुरू राहिली. मात्र ही तुरळक प्रमाणात होती.
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई ?
एसटीमध्ये झालेल्या कायद्यानुसार एसटी कर्मचारी संपात सहभागी झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करता येते. संपात सहभागी झालेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. ही यादी आल्यानंतर संबधितांवर कारवाईची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणात अहवाल आल्यानंतर कारवाईची प्रक्रिया होईल, असे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी सांगितले.