पुलांच्या पुनर्बांधणीसाठी ८२ कोटी
By Admin | Published: November 3, 2016 12:52 AM2016-11-03T00:52:26+5:302016-11-03T00:52:26+5:30
पूलांचा विकास : हळदी, बाचणी, महे, कूर, आजरा, बालिंगासह २६ कामांचा समावेश
कोल्हापूर : सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर प्रत्येक जिल्ह्यांतील जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील पुलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, पुलांच्या पुनर्बांधणीसाठी ८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २६ लहान-मोठ्या पुलांच्या कामाचा समावेश आहे.
महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून एस. टी. बस नदीतून वाहून गेली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील सर्व ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ब्रिटिशकालीन आणि जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले असून, तातडीने ज्या ठिकाणी पुलांचे बांधकाम करणे आवश्यक आहे अशा कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
देवगड-निपाणी रस्त्यावरील कागल तालुक्यातील वेदगंगा नदीवरील निढोरीजवळच्या पुलाचे बांधकाम ११३ वर्षांपूर्वीचे असून, या ठिकाणी भूसंपादनासह नवीन पूल आवश्यक आहे. यासाठी बारा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. बाचणी (ता. करवीर) येथील जुन्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून वाहतूक करणे धोकादायक बनल्याने येथे तुळशी नदीवर एक कोटीचा उंच आणि दुपदरी पूल प्रस्तावित करण्यात आला आहे.
हळदी गावाजवळ भोगावती नदीवर असलेला पूल जुना आणि अरुंद असल्याने तसेच येथील जोडरस्ते बुडणारे असल्याने येथे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे येथे पंधरा कोटी रुपये खर्चून उंच आणि दुपदरी पूल बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे; तसेच महे गावाजवळील जुना पूलही पावसाळ्यात पाण्यात बुडतो. दरवर्षी पंधरा ते एकवीस दिवस हा पूल पाण्याखाली जात असल्याने येथे बारा कोटींचा पूल सुचविण्यात आला आहे.
कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील कूरजवळचा पूल ब्रिटिशकालीन असल्याने तेथे तेरा कोटींचा नवीन पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. येथील पुलाला ८२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजरा-चंदगड मार्गावरील ८५ वर्षे पूर्ण केलेल्या संताजी पुलाला पर्याय म्हणून तीन कोटींचा नवा पूल सुचविण्यात आला आहे, तर चंदगड-इब्राहिमपूर-आजरा राज्यमार्गावरील गडहिंग्लज तालुक्यातील सहा कामांसाठी एक कोटी ६० लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच चंदगड तालुक्यातील पाच जुन्या पुलांच्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी दोन कोटी ९३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल हा १३१ वर्षांचा असल्याने या ठिकाणी नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. त्यासाठी तेरा कोटी रुपयांचा नवीन पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. कागल तालुक्यातील लिंगनूर व कापशी या दरम्यानच्या दगडी पुलाचे बांधकाम खराब झाल्याने येथेही अडीच कोटींचे दोन पूल सुचविण्यात आले आहेत.
आजऱ्याच्या ‘व्हिक्टोरिया’ची स्थिती चांगली
आजरा शहराजवळील व्हिक्टोरिया पूल हा ब्रिटिशकालीन असून, त्याला १२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, हा पूल अजूनही भक्कम स्थितीत असल्याने तातडीने या ठिकाणी पर्यायी पुलाची गरज नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, संताजी पुलाची अवस्था वाईट असल्याने पर्यायी पूल सुचविण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्यात आले. त्यानंतर तातडीने जेथे पर्यायी पूल आवश्यक आहेत किंवा दुरुस्ती, मजबुतीकरण आवश्यक आहे. त्यानुसार हा ८२ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
- सदाशिव साळुंखे,
अधीक्षक अभियंता, कोल्हापूर