ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी राज्यात ८२ वसतिगृहे,वीस वर्षांच्या लढ्याला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 12:42 PM2021-06-03T12:42:12+5:302021-06-03T12:43:20+5:30
Sugar factory Child Hostel Kolhapur : राज्यातील ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांच्या मुलां, मुलीसाठी राज्यभरातील ४१ तालुक्यांत ८२ वसतिगृहे उभारली जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत २० वसतिगृहे उभी राहणार आहेत. बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाने ऊसतोडणी कामगार संघटनेच्या २० वर्षांच्या मागणीला व संघर्षाला यश आले आहे.
कोल्हापूर : राज्यातील ऊसतोडणी मजूर, वाहतूकदारांच्या मुलां, मुलीसाठी राज्यभरातील ४१ तालुक्यांत ८२ वसतिगृहे उभारली जाणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात १० तालुक्यांत २० वसतिगृहे उभी राहणार आहेत. बुधवारी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयाने ऊसतोडणी कामगार संघटनेच्या २० वर्षांच्या मागणीला व संघर्षाला यश आले आहे.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळातंर्गत सामाजिक न्याय विभागाकडून संत भगवानबाबा वसतिगृह योजना या नावाने ही वसतिगृहे उभारली जाणार आहेत. ऊसतोडणीच्या निमित्ताने तीन ते चार महिने मजुरांना स्थलांतर करावे लागत असल्याने मुलांच्या शिक्षणाचा व सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होता. त्यांची शिक्षणावरून आबाळ होत असल्याने राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेने महामंडळाच्या स्थापनेबरोबरच मुलांसाठी सुसज्ज वसतिगृहे उभारावीत, अशी मागणी सातत्याने केली जात होती.
कल्याणकारी महामंडळास ऊस खरेदीवर अधिभार आणि तेवढीच रक्कम महाराष्ट्र सरकारने द्यायची, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंदाजपत्रकाही तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याणकारी महामंडळाचे अडलेले घोडे आता पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.
सीटूकडून स्वागत
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न अग्रक्रमाने पुढाकार घेऊन धसास लावला म्हणून सीटूप्रणित ऊस तोडणी कामगार संघटनेने अभिनंदन केले आहे. शिवाय कल्याणकारी महामंडळाच्या सर्व तरतुदीही अंमलात आणाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
सिटूअंतर्गत महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेने यासाठी तब्बल २० वर्षे सरकारकडे पाठपुरावा केला. त्याला मोठे यश आले आहे. आता येथून पुढे या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याकडे शासनाने लक्ष द्यावे.
-प्रा. सुभाष जाधव,
सरचिटणीस, राज्य ऊसतोडणी कामगार संघटना