शिरोळ तालुक्यात खरिपाची ८३ टक्के पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:20+5:302021-06-29T04:16:20+5:30
संदीप बावचे : जयसिंगपूर जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने खरीप हंगामातील पिकांची जवळपास ८३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ...
संदीप बावचे : जयसिंगपूर
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने खरीप हंगामातील पिकांची जवळपास ८३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ४०० हेक्टर सोयाबीनच्या पिकात वाढ झाली आहे. दरम्यान, सरासरी ७२ मिलिमीटर पावसाची जून महिन्यात नोंद झाली आहे.
कृष्णेसह, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या चार नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम असला तरी महापूर, कोरोना महामारी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. महापुरामुळे नदीकाठची शेती पिकवायची की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या शेतकऱ्याला गतवर्षी दिलासा मिळाला. महापुराचे संकट टळले. मात्र, कोरोना विषाणूच्या महामारीने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभारले. भाजीपाला, फुलशेती शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदाही कोरोनाचे संकट आले. त्यातूनही मार्गक्रमण करीत शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीकडे व्यस्त झाला.
तालुक्यात यंदा भात ४३.५० हेक्टर, मका ८९, मूग ५४, उडीद ११०, भुईमूग १२८०, सोयाबीन १२०९, भाजीपाला ११८ तर, आडसाली ऊस ६६३ हेक्टरची पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा ३०० ते ४०० हेक्टर ज्यादा सोयाबीनची पेरणी झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतीपिकाला फटका बसला होता. यंदा जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण झाले आहे. सध्या पावसाने उसंती दिल्याने पेरणीला वेग आला आहे. तालुक्यात ८३ टक्के पेरण्या झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला.
कोट - तालुक्यात ८३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या कृषी संजीवनी सप्ताह सुरू असून २२ शेतीशाळा सुरू आहेत. यामधून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.
- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी
फोटो - २८०६२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील शिरोळ-अर्जुनवाड मार्गावरील शेतकऱ्याने भुईमुगाचे घेतलेले पीक (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)