‘गडहिंग्लज बाजार’साठी ८३ टक्के मतदान
By Admin | Published: August 3, 2015 12:46 AM2015-08-03T00:46:59+5:302015-08-03T00:46:59+5:30
आज मतमोजणी : ५२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; मतदानासाठी दोन्ही गटांतून नेत्यांचे आवाहन
गडहिंग्लज : गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शांततेत सरासरी ८३.०७ टक्के मतदान झाले. सत्ताधारी सर्वपक्षीय राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध शिवेसना-स्वाभिमानी व मित्रपक्षप्रणीत श्री शिवशाहू शेतकरी परिवर्तन आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. १८ अपक्षांसह ५२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आज सोमवारी सकाळी आठ वाजता येथील मार्केट यार्डातील ‘व्यापारी भवनात’ मतमोजणी होणार आहे.सकाळी १० वाजता चारही गटात ७ ते १३ टक्के, १२ वाजता ३७ ते ५० टक्के, २ वाजता ५८ ते ७७ टक्के ,तर ४ वाजेपर्यंत ६७ ते ८५ टक्के इतके मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ८३.०७ टक्के मतदान झाले.
संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी हमाल-तोलारी गटातून सत्ताधारी आघाडीचे विद्यमान संचालक बाबूराव चौगुले यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित १८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विरोधी आघाडीने १६ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
कृषी प्रक्रिया गटात सत्ताधारी आघाडीचे विद्यमान संचालक व काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव नार्वेकर आणि विद्यमान संचालक व जनता दलाचे माजी तालुकाध्यक्ष श्रीरंग चौगुले यांच्यात चुरशीचा सामना झाला. स्वतंत्रपणे रिंगणात उतरलेल्या चौगुलेंसाठी त्यांच्या ‘सर्वपक्षीय’ मित्रमंडळींनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे मतदानावेळी दिसून आले.
दोनही आघाड्यांनी खास वाहनांतून आपापल्या मतदारांना गटागटाने केंद्रावर आणून मतदान करून घेतले. प्रत्येक केंद्रावर संबंधित परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, जि. प. व पं. स. सदस्यांसह प्रमुख कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून होते.
गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल असे साडेतीन तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चारही तालुक्यांतील मिळून १८ केंद्रांवर रविवारी मतदान झाले. विरोधी आघाडीच्या आक्रमक प्रचारामुळे सावध झालेल्या सत्ताधारी आघाडीने मतदान करून घेण्यासाठी फिल्डिंग लावल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.
सत्ताधारी आघाडीतर्फे आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार नरसिंगराव पाटील, भरमू पाटील, गोपाळराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, प्रकाशराव चव्हाण, मुकुंदराव देसाई, रवींद्र आपटे, रामराजे कुपेकर, बी. एन. पाटील, आदींनी विरोधी आघाडीतर्फे माजी आमदार संजय घाटगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्यान्नावर, सुरेशराव चव्हाण-पाटील, विद्याधर गुरबे यांनी मतदारांना आवाहन केले.