‘रेशीम’मधून कोल्हापूर जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी वर्षाला कमावले १२ कोटी
By भीमगोंड देसाई | Published: May 14, 2024 01:35 PM2024-05-14T13:35:41+5:302024-05-14T13:39:15+5:30
शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून प्रोत्साहन
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पारंपरिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील ८३७ शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून त्यातून २०२३-२४ या वर्षात १२ कोटींची कमाई केली आहे. रेशीम निर्मिती करून त्याची प्रतिकिलो ५०० ते ६०० रुपयांनी विक्री केली आहेत. त्यांना शासनाच्या रेशीम कार्यालयांकडून प्रोत्साहन मिळत असून त्यांना गरजेनुसार अनुदानावर अंडीपुंजाचा पुरवठा केला जात आहे.
राज्यातील एकमेव अंडीपुंज निर्मिती केंद्र गडहिंग्लजला असल्याने जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. सध्या करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज तालुक्यातील ८३७ शेतकऱ्यांनी ८३५ एकर जमिनीवर रेशीम निर्मितीसाठी तुतीच्या वनस्पतीची लागवड केली आहे. या शेतकऱ्यांना या वर्षी ३ लाख ४९ हजार ४१० अंडीपुजांची वितरण शासनाच्या रेशीम कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
एक किलोला ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान अंडी पुजांसाठी देण्यात आले आहे. इतके अंडीपुंजा घेऊन ८३७ शेतकऱ्यांनी २ लाख २६ हजार ७०७ रेशीम कोषचे उत्पादन केले. ५०० ते ६०० रुपये किलो दरानी खुल्या बाजारात त्याची विक्री केली. यातून त्यांना एकूण १२ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढल्याचा दावा रेशीम कार्यालयाचा आहे.
- रेशीम शेतीसाठी किती अनुदान मिळते?
रोजगार हमी योजनेतून एक एकरसाठी ४ लाख १८ हजार तर सिल्क समग्र योजनेतून ३ लाख ७५ हजार रुपये अनुदान मिळते. अनुदान मिळण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्याला जून, जुलै महिन्यात तुतीची लागवड लागेल. त्यानंतर अंडी पुंजापासून रेशीमनिर्मितीसाठी ५० बाय २२ इतका शेड उभारावा लागणार आहे. यासाठी शेतकऱ्याला सुरुवातीला स्वत:कडून पैसे गुंतवावे लागणार आहे. त्यानंतर पात्र ठरल्यानंतर अनुदान मिळू शकते. रोजगार हमीचे अनुदान त्या त्या वेळी मजुरांच्या नावे जमा होते.
अनुदानासाठी अर्ज कोठे करावा?
रेशीम कार्यालय, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर.
एकरी उत्पन्न किती मिळू शकते?
रेशीम शेतीतून एक एकरमध्ये कमीत कमी खर्च वजा जाता दोन लाखांचे उत्पन्न वर्षाला मिळू शकते. जोडधंदा म्हणून करता येते. रेशीमला मागणी चांगली असल्याने बाजारपेठ शोधण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही.
- तालुकानिहाय रेशीम उत्पादक शेतकरी संख्या अशी
करवीर :१२७
हातकणंगले : ८४
गडहिंग्लज : ६२७
रेशीम शेतीतून चांगले उत्पन्न मिळते. बाजारपेठही सहज उपलब्ध आहे. रेशीम उत्पादनासाठी अनुदानही मिळते. म्हणून याकडे शेतकऱ्यांनी वळावे. - राजेश कांबळे, रेशीम विकास अधिकारी, कोल्हापूर.