कोल्हापूर जिल्ह्यात ‘प्रोत्साहन’चे ८३.८९ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, अद्याप 'इतके' प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:28 PM2023-02-18T16:28:22+5:302023-02-18T16:28:44+5:30
कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदानास दुसऱ्या यादीतील पात्र २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३ कोटी ८९ लाख रुपये जमा झाले ...
कोल्हापूर : प्रोत्साहन अनुदानास दुसऱ्या यादीतील पात्र २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३ कोटी ८९ लाख रुपये जमा झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार ८९६ शेतकऱ्यांना ५६२ कोटी ६९ लाख रुपये अनुदानाच्या रूपाने मिळाले आहेत. अद्याप ३२ हजार ६०७ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.
राज्य सरकारने पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन वर्षातील पीककर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांकडून माहिती मागवली होती. जिल्ह्यातील तीन लाख ५७७ शेतकऱ्यांनी माहिती ऑनलाइन भरली होती.
पहिल्या यादीत एक लाख २८ हजार ८०१ पात्र शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध झाली. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर एक लाख २० हजार ४३५ शेतकऱ्यांना ४४० कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. ५७ हजार पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी आली, मात्र अनुदान लवकर मिळाले नव्हते. मध्यंतरी दहा हजार ५०६ शेतकऱ्यांचे ३९ कोटी १० लाख रुपयांचे अनुदान आले. उर्वरित शेतकऱ्यांपैकी २२ हजार ९५४ शेतकऱ्यांचे ८३ कोटी ८९ लाख रुपयांचे पैसे आले आहेत.
दुसऱ्या यादीतील प्रलंबित पात्र शेतकऱ्यांपैकी २२ हजार ९५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८३.८९ कोटी वर्ग झालेले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत पाठपुरावा सुरू आहे. - नीळकंठ करे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर)
पहिली यादी | दुसरी यादी | |
पात्र शेतकरी | १ लाख २८ हजार ८०१ | ५७ हजार |
पैसे जमा झालेले | १ लाख २० हजार ४३५ | ३३ हजार ४६० |
रक्कम | ४४०.७० कोटी | १२२.९९ कोटी |
शिल्लक शेतकरी | ८३६६ | ३२६७ |