टोकाची ईर्ष्या, कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी चुरशीने ८४ टक्के मतदान; उद्या निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 06:08 PM2022-12-19T18:08:04+5:302022-12-19T18:08:30+5:30
उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० ग्रामपंचायतींसाठी रविवारी ईर्ष्या, चुरस व तणावाच्या वातावरणात तब्बल ८४ टक्के मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी मतदान करून घेण्यावरून वादावादीचे प्रकार घडले असले, तरी कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. सरपंचपदाच्या ११९३ तर सदस्य पदाच्या ८९१५ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात बंद झाले असून उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजता तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
या टप्प्यात जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यापैकी ४४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात ४३० ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. गेली पंधरा-वीस दिवस या गावांत प्रचाराची अक्षरश: राळ उडाली होती. काही गावांत सरळ लढत तर बहुतांशी ठिकाणी अटीतटीची तिरंगी लढत झाली होती. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.
बहुतांशी गावांत बाचाबाचीचे प्रकार घडले आहेत. मतदार आणण्यावरून, मतदान कोणी करायचे, यासह उमेदवारांच्या मतदान केंद्रातील वावरावरून शाब्दिक खडाजंगीही उडाल्या आहेत. त्यामुळे दिवसभर तणाव राहिला होता. काही ठिकाणी मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. मात्र, ते बदलल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीत झाली.
झाडून मतदान करण्याचा प्रयत्न
कमी मतदान असलेल्या गावांतील निकाल हा दोन-तीन मतांवर असल्याने येथे एका एका मतासाठी संघर्ष पहावयास मिळाला. त्यामुळे प्रत्येकाने आपापली मते झाडून बाहेर काढली होती.
कडक पोलिस बंदोबस्त
राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे पोलिसांच्या हिटलिस्टवर होती. त्यानुसार तिथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाद होऊ नयेत, यासाठी पाेलिसांचे प्रयत्न होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे भरारी पथक प्रत्येक गावात फिरत होते.