प्रश्नपत्रिका फुटल्याची अफवा, एनसीसी ‘सी’ परीक्षा रद्द; कोल्हापुरातील ८४० विद्यार्थ्यांना फटका
By संदीप आडनाईक | Published: February 19, 2024 12:38 PM2024-02-19T12:38:29+5:302024-02-19T12:38:54+5:30
कोल्हापूर : यू ट्यूबवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवेमुळे देशभर घेण्यात येणारी एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा रविवारी एनसीसी मुख्यालयाने अचानक स्थगित ...
कोल्हापूर : यू ट्यूबवर प्रश्नपत्रिका फुटल्याच्या अफवेमुळे देशभर घेण्यात येणारी एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा रविवारी एनसीसी मुख्यालयाने अचानक स्थगित केली. यामुळे कोल्हापूर शहरातील दोन केंद्रांवर ही परीक्षा देणाऱ्या सुमारे ८४० विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. आता ही परीक्षा २५ फेब्रवारी रोजी होणार आहे.
राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत रविवारी संपूर्ण देशभरात एनसीसी ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येणार होती. हे ‘सी’ प्रमाणपत्र महाविद्यालयांच्या एसडी आणि एसडब्ल्यू विद्यार्थ्यांना तीन वर्षांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तसेच ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर देण्यात येते. एनसीसीच्या विद्यार्थ्याने जर ७५ टक्के एनसीसी परेडमध्ये भाग घेतला असल्यास, ‘बी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यास आणि संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात (सीएटीसी) भाग घेतला असल्यास या परीक्षेला बसण्यास पात्र ठरविण्यात येते.
दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतली जाते. कोल्हापुरात शाहू कॉलेज आणि गोखले कॉलेजमध्ये रविवारी सकाळी १०:३० ते १ यावेळेत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. शाहू कॉलेजमधील ४५० आणि गोखले कॉलेजमधील ३९० विद्यार्थ्यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील पात्र सुमारे ८४० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
अफवा अशीही..
कोल्हापुरातील एका कॉलेजच्या केंद्रावर सकाळी १०:३० वाजता पेपर होणार होते. तत्पूर्वीच प्रश्नपत्रिका यू ट्यूबवरून फुटल्याची अफवा पसरल्यामुळे एनसीसी मुख्यालयाकडून ही परीक्षा स्थगित करण्याचा आदेश सकाळी १० वाजता केंद्रप्रमुखांकडे आला. एका कॉलेजमधील एका विद्यार्थ्याकडे ही प्रश्नपत्रिका मिळाल्याची तर प्रश्नपत्रिकेतील १६ ते १७ प्रश्न सिलॅबसबाहेरील छापल्यामुळे परीक्षा स्थगित केल्याची अफवा आहे. संबंधित दोन्ही केंद्रांवर सकाळी १० वाजताच तत्काळ ही प्रक्रिया थांबविण्याच्या सूचना मिळाल्याने ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.