८४७२ संस्था मतदानास पात्र
By admin | Published: March 26, 2015 12:36 AM2015-03-26T00:36:28+5:302015-03-26T00:36:38+5:30
जिल्हा बँक : अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; दुबारसह ३८ संस्था वगळल्या
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये ८४७२ संस्था मतदानास पात्र ठरल्या आहेत. प्रारूप यादीवर आलेल्या १५४ हरकतींपैकी ८२ हरकती स्वीकारल्या, तर ७२ फेटाळण्यात आल्या. दुबार ठरावांसह इतर कारणांनी ३८ संस्था प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आल्या.
जिल्हा बँकेची प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. यादीवर १५४ हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी पूर्ण होऊन त्यातील ८२ हरकती स्वीकारण्यात आल्या. एकूण सर्व हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मूळ मतदार यादीत ४९ संस्था वाढल्या असून, ९ कमी झाल्या. त्यामुळे निवडणुकीसाठी ८४७२ संस्था पात्र ठरल्या.
प्रारूप यादीत ३३ दुबार ठराव दाखल झाले होते. त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चार संस्था पात्र ठरविल्या, तर २९ संस्था अपात्र ठरविण्यात आल्या. या संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्यात आलेला नाही. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही संस्थांनी भागभांडवलाची अट पूर्ण केली होती. या संस्थांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला. (प्रतिनिधी)
गगनबावडा तालुक्यातील १८ विकास सेवा संस्थांवर हरकत घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन त्या पात्र ठरविल्या.
जिल्हा बॅँकेसाठी पहिल्यांदाच तालुका पातळीवर मतदान होणार आहे. पूर्वी एकत्र मतदान व्हायचे, पण मतदारांना अधिक सोयीचे व्हावे, यासाठी तालुका पातळीवर मतदान घेतले जाणार आहे.
अपुरे भागभांडवल यासह इतर कारणांनी नऊ संस्था वगळण्यात आल्या. राधानगरी ग्रामोद्योग संघ, जयशिवराय दूध (आणाजे), शिवशक्ती पाणीपुरवठा(शिरोळ), छत्रपती शिवाजी महाराज विकास (दिंडेवाडी), आर. के. पाटील विकास (कुरुंदवाड), पांडुरंग विकास (दिंडेवाडी), थमलिंग विकास (पिंपळगांव), राजाराम ग्रामीण पतसंस्था (कोगे).