Kolhapur News: शिवाजी विद्यापीठ येथे भुयारी मार्गासाठी साडेआठ कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 05:13 PM2023-02-17T17:13:07+5:302023-02-17T17:17:10+5:30
वाहनांची सततची वर्दळ या रस्त्यावरून असल्याने हा रस्ता असुरक्षित
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाची मुख्य इमारत आणि समोरच्या रस्त्यापलीकडील विभाग यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गासाठी आठ कोटी ४८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी तातडीने कार्यवाही करत निर्णय घेतला आहे.
शिवाजी विद्यापीठाचा एकूण परिसर ८५३ एकर आहे. या जागेतून पूर्वीचा राष्ट्रीय महामार्ग आणि सध्या कोल्हापूर महापालिकेचा रस्ता जातो. या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. विद्यापीठाच्या पश्चिम भागात प्रशासकीय इमारत, विविध अधिविभागांच्या इमारती, क्रीडा संकुल अशा अनेक इमारती अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत.
तर समोरच्या पूर्व भागात तंत्रज्ञान, स्कूल ऑफ नॅनो सायन्स, शाहू संशोधन केंद्र, शिक्षणशास्त्र, यशवंतराव चव्हाण रूरल डेव्हलपमेंट, पत्रकारिता व संवादशास्त्र विभागाच्या इमारतीही उभारण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या विद्यापीठासमोरील रस्त्यावरून रोज दोन ते तीन हजार विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक आणि अभ्यागत ये-जा करत असतात.
वाहनांची सततची वर्दळ या रस्त्यावरून असल्याने हा रस्ता असुरक्षित बनला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाने भुयारी मार्ग आणि सेवा रस्त्याचे ८ कोटी ४८ लाख ८१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांची मान्यता घेऊन शासनाकडे सादर केले होते. त्यानुसार १५ फेब्रुवारीला या निधीच्या मंजुरीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.