ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:56 AM2017-10-17T00:56:12+5:302017-10-17T00:56:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात ४३५ ग्रामपंचायतींसाठी सोमवारी चुरशीने व ईर्ष्येने सरासरी ८४.५१ टक्के मतदान झाले. अचानक दुपारनंतर पडणाºया पावसाच्या धास्तीने तसेच शेतीकामासाठी वेळ मिळावा, यासाठी सकाळी सातपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोतोली, वडणगे, कोलोली, बोरवडे येथे किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. मतमोजणी आज, मंगळवारी होत आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यापासून गुलाल व डॉल्बी लावण्यास मनाई करण्यात आली आहे.
सकाळी साडेसात वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. दिवाळी आणि शेतीच्या कामासाठी वेळ मिळावा म्हणून ग्रामस्थांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केल्यामुळे मतदानाचा वेग वाढला. या निवडणुकीत गावागावांत कमालीची ईर्षा व चुरस दिसून आली. एकेका मतासाठी उमेदवार व समर्थकांकडून चढाओढ सुरू होती. वृद्ध महिला व आजारी रुग्णांना थेट उचलूनच कार्यकर्ते मतदान केंद्रांवर जात होते. संवेदनशील केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तासह राखीव बटालीयनच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या होत्या.
वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती हायस्कूलच्या केंद्रावर सकाळी साडेनऊपर्यंत १७ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी मतदारसंख्या जास्त असल्याने व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मतदान केंद्राबाहेर उमेदवार व समर्थकांची गर्दी दिसत होती. सकाळच्या टप्प्यात प्रयाग चिखली येथील केंद्र शाळेत सरासरी १६ टक्के मतदान झाले. पिंपळे तर्फे ठाणे (ता. पन्हाळा) येथील विद्यामंदिरातील केंद्रावर सरासरी ३० टक्के मतदान झाले. संवेदनशील असलेल्या कोलोली येथे सकाळी ११.३० पर्यंत सरासरी ४० टक्के मतदान झाले. या ठिकाणी सकाळी सातपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोतोलीतील नेहरू विद्यामंदिर येथे सरासरी ५० टक्के मतदान झाले. करंजफेण येथे दुपारच्या टप्प्यातच ८५ टक्के मतदान झाल्याने दुपारी मतदान केंद्र ओस पडले होते. बांबवडे येथे दुपारी दोनपर्यंत ६५ टक्के मतदान झाले होेते. येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या केंद्राबाहेर एकेका मतासाठी धावपळ सुरू होती. सरूड येथील महात्मा गांधी विद्यालय या केंद्राबाहेर दुपारी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर कार्यकर्त्यांच्या गराड्यात थांबून चर्चा करीत होते. कापशी येथील विद्यामंदिरच्या केंद्रावर दुपारी उन्हातही मतदानासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.
बोरवडे, वडणगेत वादावादी
पन्हाळा तालुक्यातील कोलोली आणि कोतोली, कागल तालुक्यातील बोरवडे व करवीर तालुक्यातील वडणगे येथे किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदान केंद्रांबाहेर उमेदवार व समर्थकांची गर्दी दिसत होती. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे सकाळी मतदान केंद्राच्या आवारात थांबलेल्या उमेदवार व समर्थकांना पोलिसांनी बाहेर काढताना वादावादीचा प्रकार घडला.