कोगनोळी ग्रामपंचायत निवडणुकीत शांततेत 85 टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 05:40 PM2020-12-28T17:40:33+5:302020-12-28T17:42:43+5:30
Grampanchyat Kognoli Karnataka-कोगनोळी येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने 85 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आजपर्यंत सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीला भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचे आव्हान होते. यावेळी ग्रामविकास आघाडी सत्ता अबाधित ठेवणार की परिवर्तन होणार हे बुधवार दिनांक 30 रोजीच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.
बाबासो हळिज्वाळे
कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शांततेत पण चुरशीने 85 टक्के मतदान झाले. या निवडणुकीमध्ये आजपर्यंत सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेसप्रणित ग्रामविकास आघाडीला भाजप प्रणित परिवर्तन आघाडीचे आव्हान होते. यावेळी ग्रामविकास आघाडी सत्ता अबाधित ठेवणार की परिवर्तन होणार हे बुधवार दिनांक 30 रोजीच्या मतमोजणीनंतर ठरणार आहे.
कोगनोळीमध्ये पुरुष ४८८२ व महिला ४५८६ असे एकूण ९४६८ मतदार आहेत. त्यापैकी ४१९४ पुरुष व ३८३९ महिला असे एकूण ८०३३ म्हणजेच शेकडा ८५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत चुरशीने पार पडली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. प्रत्येक उमेदवार व कार्यकर्ते आपले मताधिक्य वाढावे यासाठी धडपड करताना दिसत होते. मतदानासाठी वारंवार मतदारांशी संपर्क साधत होते. अपंग व वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती.
येथील मतदान केंद्रावर निपाणी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा राखीव पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक वाय के कश्यपनावर यांनी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी टी नाडकर्णी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून टी एम भोसले व परशुराम चावर यांनी कामकाज पाहिले.
या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या ग्रामविकास आघाडीसाठी माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील, माजी बेळगाव जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील तर भाजपप्रणीत परिवर्तन आघाडीसाठी उत्तम पाटील बोरगावकर, बसवप्रसाद जोल्ले यांनी परिश्रम घेतले होते.