जिल्हा बँकेसाठी ८५०० ठराव दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:39 AM2021-02-23T04:39:29+5:302021-02-23T04:39:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी विविध गटांतून ८५०० ठराव दाखल झाले. आठ दिवसांत केवळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी विविध गटांतून ८५०० ठराव दाखल झाले. आठ दिवसांत केवळ १३२३ ठराव आले आहेत.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी २०२० मध्ये ७१७७ ठराव दाखल झाले होते. उर्वरित ठरावासाठी सोमवार (दि. १५) पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. गेल्या आठ दिवसांत १३२३ ठराव दाखल झाले. यामध्ये सर्वाधिक पाणीपुरवठा, दूध, मजूर व इतर संस्थांच्या ९६५ ठरावांचा समावेश आहे. जिल्हा बँकेचे सर्वाधिक ११३८ सभासद हे हातकणंगले तालुक्यातील आहेत. येथून गेल्या आठ दिवसांत ३९९ ठराव आले तर सर्वांत कमी १३ ठराव शाहूवाडी तालुक्यात जमा झाले. जिल्हा बँक प्रारूप यादी करून ती सहकार विभागाकडे दिल्यानंतर साधारणत: १० मार्चला ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. साधारणत: हरकती, त्यावरील सुनावणी व निकाल दिल्यानंतर ६ एप्रिलदरम्यान अंतिम यादी प्रसिद्ध होऊ शकते.
रात्री उशिरापर्यंत गोळाबेरीज
तालुक्याच्या ठिकाणी ठराव संकलन झाले. सायंकाळी सहापर्यंत ठराव जमा करण्याची मुदत असल्याने बारा तालुक्यांतून ठरावांची आकडेवारी घेऊन त्याची गोळाबेरीज करण्यात रात्री उशिरापर्यंत सहकार विभागाचे अधिकारी गुंतले होते.
अवसायनातील संस्थांची छाननी होणार
दाखल झालेल्या ठरावांमध्ये काही अवसायनातील संस्थांचा समावेश आहे. त्यांच्या छाननीचे काम उद्या (मंगळवारी) केली जाणार आहे. त्यानंतर प्रारूप यादी तयार केली जाणार आहे.
गटनिहाय दाखल झालेले ठराव असे
विकास संस्था - १९०५
खरेदी-विक्री संस्था - ५४७
नागरी पतसंस्था - १४०३
पाणीपुरवठा, दूध, मजूर व इतर संस्था - ४६४५