फुलेवाडी रिंगरोड परिसरात ८७ डेंग्यूचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:29+5:302021-07-22T04:15:29+5:30

फुलेवाडी : फुलेवाडीसह लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोडवर डेंग्यूची साथ मोठ्याने फैलावत असून रिंगरोडवरील अनेक कॉलन्यांमध्ये जवळपास ८७ ...

87 Dengue patients in Phulewadi Ring Road area | फुलेवाडी रिंगरोड परिसरात ८७ डेंग्यूचे रुग्ण

फुलेवाडी रिंगरोड परिसरात ८७ डेंग्यूचे रुग्ण

Next

फुलेवाडी : फुलेवाडीसह लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी रिंगरोडवर डेंग्यूची साथ मोठ्याने फैलावत असून रिंगरोडवरील अनेक कॉलन्यांमध्ये जवळपास ८७ पेक्षा जास्त तर, लक्षतीर्थ वसाहतीत १० डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या परिसरात डेंग्यूचे संकट उभे राहिले असले तरी फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रात डेंग्यूच्या रुग्णांबाबत कोणतीही नोंद नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसतानाच दुसरीकडे डेंग्यूने डोके वर काढल्याने प्रशासनासह नागरिक चिंतेत आहेत.

फुलेवाडी रिंगरोडवरील मातंग वसाहत (४), जांभळी कॉलनी-धनगरवाडा (३), शिवशक्ती कॉलनी (४), महालक्ष्मी कॉलनी (३), हरिप्रिया कॉलनी (८) साई सृष्टी अपार्टमेंट (६), राजे संभाजीनगर व साईप्रसाद कॉलनी ५७ इतके रुग्ण आढळले आहेत. लक्षतीर्थ वसाहत परिसरातील केसरकर गल्ली, रेडेकर गल्ली, व्यंकटेश कॉलनीमध्ये १० रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास या भागात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. या भागातील अनेक कॉलन्यांमध्ये अजून रस्ता, गटारी नसल्याने पावसाचे पाणी साचून राहते. परिणामी डासांची पैदास मोठ्या प्रमाणामध्ये होण्यास मदत होते.

कोट : कोरोनाकडे जास्त लक्ष केंद्रित केल्याने इतर साथीच्या आजारांचा सर्वे झालेला नाही. खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांकडून डेंग्यू रुग्णांबाबत माहिती दिली जात नाही. माहिती मिळाल्यास त्या परिसरात सर्वे करता येईल. -डॉ. सुनील नाळे, आरोग्य अधिकारी

चौकट : औषध फवारणीची गरज

फुलेवाडीसह रिंगरोडवर औषधफवारणी होण्याची गरज आहे. कारण यातील अनेक परिसरामध्ये अजूनही रस्ते गटारी पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे पावसाचे, घरगुती सांडपाणी गटारीमध्ये किंवा रस्त्यातच साचून राहत आहे. त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे. पैदास कामी करण्यासाठी परिसरात औषध फवारणी होण्याची गरज आहे.

Web Title: 87 Dengue patients in Phulewadi Ring Road area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.