३६ लाख मतदारांच्या बोटांवर लागणार ८७ लिटर शाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:33 AM2019-04-20T00:33:16+5:302019-04-20T00:33:20+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (अंगठ्याजवळील बोटावर) शाई लावण्यात येते. अशा शाईच्या तीन लाख बाटल्या महाराष्ट्रात आणण्यात आल्या आहेत. त्यांतील १० हजार ४३५ बाटल्या कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यातील आठ हजार ६८१ बाटल्यांचे वाटप करण्यात आले असून, येथील ३६ लाख ४६ हजार ९०८ मतदारांच्या
तर्जनीवर ८६.८१ लिटर शाई लागणार आहे.
जसजशी मतदानाची २३ एप्रिल तारीख जवळ येत आहे, तसतसे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग वेगवान होत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे बहुतांश साहित्य प्रशासनाला प्राप्त झाले आहे. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे शाई होय. मतदान केल्यानंतर मतदाराच्या तर्जनीवर जांभळट निळी शाई लावण्यात येते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १८ लाख ७४ हजार ३४५ मतदार व २१४८ मतदान केंदे्र आहेत. तसेच हातकणंगले मतदारसंघात १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार व १८५६ केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर दोन शाईच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत. एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते.
या एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांच्या तर्जनीवर जांभळट निळ्या शाईचे निशाण लावण्यात येईल. २००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदाराच्या बोटावर निळ्या शाईचा केवळ एक ठिपका लावण्यात येत होता. मात्र, २००६ मध्ये निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ रेषा आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचे प्रमाण जास्त लागत आहे.
कोणत्या बोटावर लागते शाई
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावली जाते. नंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. याआधीच तर्जनीवर शाई लागलेली असेल तर त्या मतदाराला मतदान करू दिले जात नाही.
म्हैसूरची शाई
संपूर्ण देशात मतदानाच्या वेळी म्हैसूरची शाई वापरण्यात येते. येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये ती तयार होते. या कंपनीतून जगातील
२५ देशांना निवडणुकीच्या शाईचा पुरवठा केला जातो. ही शाई तर्जनीवर लावल्यानंतर अजिबात पुसता येत नाही, अशी या शाईची ख्याती आहे.