‘निसर्ग पर्यटन’मधून राधानगरी अभयारण्यासाठी ८८ लाखांचा निधी
By admin | Published: June 12, 2017 12:58 AM2017-06-12T00:58:35+5:302017-06-12T00:58:35+5:30
राज्य शासनाची योजना : पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्य शासनाच्या निसर्ग पर्यटन योजनेमधून राधानगरी अभयारण्यातील विविध विकासकामांसाठी ८८ लाख ६१ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये सर्वाधिक राऊतवाडी परिसर सुधारणा करण्यासाठी १९ लाख ५९ हजार रुपयांचा निधीचा समावेश आहे. हा निधी वन विभागाकडे प्राप्त झाला असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
‘राज्य योजना २०१७-१८ निसर्ग पर्यटन योजने’मधून राधानगरी अभयारण्यासह परिसरातील विविध विकासकामांसाठी कोल्हापूर वन विभागाने सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार या योजनेंतर्गत शासनाने निधी मंजूर केला.
परिसरातील विविध कामाबरोबरच राधानगरी अभयारण्यात वनसंरक्षकांच्या निवाऱ्यासाठी अन्य योजनेमधून नऊ कुटी करण्यात येणार आहेत. यासाठी ७२ लाख रुपये मंजूर झाले असून, प्रत्येक कुटीला सरासरी सात ते आठ लाख रुपये खर्च येणार आहे. आतापर्यंत यातील तीन कोटींचे काम झाले असून, उर्वरित कामेही लवकर करण्याचा वन विभागाचा प्रयत्न राहणार आहे.
वन विभाग कर्मचाऱ्यांना निवासस्थानांच्या बांधकामासाठी अन्य योजनेमधून ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत.