हिवाळ्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये ८८ टक्के पाणी, शेतीच्या सिंचनावर मर्यादा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 12:12 PM2023-12-01T12:12:50+5:302023-12-01T12:13:37+5:30
जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा किती...जाणून घ्या
कोल्हापूर : पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये ८८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची प्रचंड मागणी वाढल्याने पुढच्या पावसाळ्यापर्यंत धरणातीलपाणी पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. यामुळे आत्तापासून पाटबंधारे प्रशासनाने शेतीसाठी उपसाबंदी लागू केली आहे.
जिल्ह्यात मोठे प्रकल्प चार, मध्यम प्रकल्प दहा, लघु पाटबंधारे प्रकल्प ५६ आहेत. या सर्व धरणांत ८८ टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवसात ८७ टक्के पाणीसाठा होता. मात्र, यंदा सर्व धरणे शंभर टक्के भरलेली नाहीत. यामुळे उपलब्ध असलेले पाणी जपून वापरावे लागणार आहे. दरम्यान, दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाला गळती आहे. ती काढण्याचे नियोजन केले आहे. या धरणातील पाण्यावर यंदा उसाचे क्षेत्र कमी करा, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाने केले आहे.
त्याच धरणावरून कोल्हापूर शहरासाठी थेट पाइपलाइन योजनेतून पाणी पुरवठा सुरू झाला आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. सर्वच धरणांतून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. परिणामी मागणीनुसार पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
तीन धरणांत शंभर टक्के पाणी
चित्री, घटप्रभा, जांबरे या तीन मध्यम प्रकल्पांत शंभर टक्के पाणीसाठा आहे. याउलट सर्वात कमी ५६ लघुपाटबंधारे प्रकल्पांत ८२ टक्के तर तुळशी, दूधगंगा धरणात ८३ टक्के पाणीसाठा आहे.
आज बैठक
कोल्हापूर ताराबाई पार्कातील पाटबंधारे कार्यालयात आज, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसाेबत बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत उन्हाळ्यात शेती तसेच पिण्यासाठी पाणी कमी पडू नये, यासाठी आत्तापासून उपसाबंदी करण्यासंबंधी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील यंदाचा आजपर्यंत आणि गेल्यावर्षाचा पाणीसाठा टीएमसीमध्ये कंसात असा :
राधानगरी : ७.४८ (७.८६), तुळशी : २.८७ (३.३३), दूधगंगा : २१.१३ (१८.९२), वारणा : ३१.९ (३२.६), कासारी : २.६८ (२.४९), कडवी : २.२७, कुंभी : २.६४ (२.५१), पाटगाव :३.६३ (३.५७), चिकोत्रा : १.२९ (१.५२), चित्री : १.८८ (१.८५), जंगमहट्टी : १.२२ (१.१९), घटप्रभा : १.५६ (१.५५), जांबरे : ०.८२ (०.८२), आंबेओहोळ : १.२० (१.०१).