Kolhapur: बिद्री कारखान्यासाठी ईर्षेने ८९ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 11:42 AM2023-12-04T11:42:27+5:302023-12-04T11:42:41+5:30

किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली

89 percent polling for Dudhganga Vedganga Cooperative Sugar Factory in Bidri | Kolhapur: बिद्री कारखान्यासाठी ईर्षेने ८९ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

Kolhapur: बिद्री कारखान्यासाठी ईर्षेने ८९ टक्के मतदान, उद्या मतमोजणी

सरवडे (कोल्हापूर) : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी ईर्षेने व चुरशीने चार तालुक्यांतील १७३ केंद्रांवर ५६ हजार ९१ पैकी ४९ हजार ९४० (८९.०३ टक्के) मतदान झाले. मुरगूड येथे बोगस मतदान होत असल्याची शंका आल्याने ‘गोकुळ’चे माजी संचालक रणजितसिंह पाटील यांनी रोखले व गोंधळ उडाला. इतर ठिकाणी किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 

पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील व कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ महालक्ष्मी विकास आघाडी व खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, समरजित घाटगे, ए.वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी यांच्यात लढत झाली. नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली असून, उद्या, मंगळवारी ‘बिद्री’वर सत्तेचे तोरण कोण बांधणार? याचा फैसला होणार आहे.

करवीर, राधानगरी, भुदरगड व कागल तालुक्यांतील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे. उत्पादक सभासद ५५ हजार ६५, तर ‘ब’ वर्ग संस्था सभासद १,०२६ असे ५६ हजार ९१ सभासद होते. त्यापैकी ४९ हजार ९४० मतदारांनी हक्क बजावला.

कारखान्याच्या २५ जागांसाठी विविध गटांतून रिंगणात असलेल्या ५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. दरम्यान, उद्या, मंगळवारी मुस्कान लॉन येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी होणार आहे.

वाढलेला टक्का कोणाला धक्का

‘बिद्री’च्या मागील निवडणुकीत ८२ टक्के मतदान झाले. तुलनेत या वेळेला मतदानाचा टक्का वाढला आहे. हा वाढलेला टक्का नेमका कोणाला धक्का देणार, हे उद्याच समजणार आहे.

कागल तालुक्यात सर्वाधिक मतदान

‘बिद्री’साठी मतदान झालेल्या १७३ केंद्रांपैकी बहुतांशी केंद्रांवर ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. त्यातही कागल तालुक्यात ९०.४७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान ९७.०१ टक्के फराकटेवाडी येथे झाले. त्यापाठोपाठ चौंडाळमध्ये ९६.३३ टक्के, कुरणीमध्ये ९५.७६ टक्के, तर निढोरीमध्ये ९५.१५ टक्के मतदान झाले.

Web Title: 89 percent polling for Dudhganga Vedganga Cooperative Sugar Factory in Bidri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.