‘धनगर आरक्षणा’ साठी ८ सप्टेंबरचा ‘अल्टिमेटम’, कोल्हापुरात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 06:10 PM2018-08-13T18:10:49+5:302018-08-13T18:13:40+5:30
धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर : धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा निर्णय सरकारने ८ सप्टेंबरपर्यंत घ्यावा, असा ‘अल्टिमेटम’ समस्त धनगर समाजातर्फे सोमवारी सरकारला देण्यात आला. याबाबतचा निर्णय होईपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम, तहसीलदारांना निवेदन या पद्धतीने आंदोलन सुरू ठेवू, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हे सरकार वेळकाढूपणा करत समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप बबन रानगे यांनी केला.
धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी़, या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर समाजातर्फे आंदोलन हाती घेतले आहे़ त्यानुसार कोल्हापूर समस्त धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी शासनाच्या निषेधार्थ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आंदोलनस्थळी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानंतर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन अहिल्यादेवींची प्रतिमा व निवेदन सादर केले. भर पावसात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले धनगर समाजबांधव ‘आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे’, ‘यळकोट, यळकोट...जय मल्हार’ असा जयघोष आणि भंडाऱ्यांची उधळण करत या आंदोलनात सहभागी झाले.
बबन रानगे म्हणाले, सरकारने २०१४ च्या निवडणुकीच्या बारामती येथक्षल जाहीर सभेत सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्येच आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते; परंतु चार वर्षे झाली तरी यावर कोणताच निर्णय झालेला नाही. सरकार वेळकाढूपणा करत असून त्यांच्याकडून समाजाची फसवणूक सुरू आहे; यामुळे सरकारवर समाजाचा विश्वास राहिलेला नाही.
बयाजी शेळके म्हणाले, घटना पुनर्विलोकन आयोगाची अध्यक्ष एन. वेंकटचलय्या यांनी २००३ मध्ये महाराष्ट्रातील सह्याद्री अतिथी गृह येथे येऊन जातीच्या नावातील घोळाबाबत सुनावणी घेऊन दुरुस्ती केली; त्यानुसार धनगड/धनगर अशी नोंद करण्यात आली; परंतु आजतागायत त्यानुसार अंमलबजावणी झालेली नाही.
प्रकाश पुजारी म्हणाले, आरक्षणासंदर्भात ८ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेऊन अनुसूचित जमातीचे दाखले तरुणांना मिळाले नाही तर वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करून मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवून सोडू.
आंदोलनात एन. डी. बोडके, उदय डांगे, बाबूराव बोडके, सिद्धार्थ बन्ने, नारायण मोटे-देसाई, विठ्ठल भमांगूळ, शहाजी सिद, हरी पुजारी, विश्वास गावडे, विकास घागरे, राजेश बाणदार, नागेश पुजारी, विठ्ठल शिनगारे, आदींसह समाजबांधव सहभागी झाले होते.