९३ टन कचऱ्याची निर्गत
By admin | Published: March 2, 2017 12:04 AM2017-03-02T00:04:25+5:302017-03-02T00:04:25+5:30
स्वच्छ भारत अभियान : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मोहीम
कोल्हापूर : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बुधवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांत स्वच्छता मोहीम हाती घेऊन ९३ टन कचऱ्याची निर्गत केली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेवदंडा, जिल्हा अलिबाग येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने देशभर शासकीय कार्यालयांच्या आवारात व शहरातील प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांचा परिसर, रेल्वे स्थानक स्वच्छ करण्यात आले.
कोल्हापुरात या मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर स्वच्छ करून खासदार संभाजीराजे छत्रपती, महापौर हसिना फरास यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
या मोहिमेत अडीच हजारांहून अधिक सदस्यांनी सहभाग घेऊन कोल्हापूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने बुधवारी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील रस्ते, कार्यालये स्वच्छ केली.
कोल्हापूर, हातकणंगले रेल्वे स्टेशन परिसरात हे अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले.
या मोहिमेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, न्याय संकुल, तहसील कार्यालये, पोलिस अधीक्षक कार्यालय, उत्पादन शुल्क, अँटीकरप्शन ब्युरो, प्रांताधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, वनविभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुरातत्त्व विभाग, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, सिंचन भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सार्वजनिक बांधकाम यांसह कोल्हापूर शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या मोहिमेत निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस उपअधीक्षक सतीश माने, महसूल तहसीलदार गणेश गोरे, पुरवठा तहसीलदार अमरदीप वाकडे, नायब तहसीलदार प्रकाश दबडे, समाजकल्याण निरीक्षक केशव
पांडव, जिल्हा खनिकर्म अधिकारी अजय भोगे, आदी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. या मोहिमेत महापौर हसिना फरास, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस उपअधीक्षक सतीश माने, आदी मान्यवर सहभागी झाले होते.