कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६० खातेधारकांना ९ कोटींचा मोबदला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:56 PM2024-06-25T15:56:43+5:302024-06-25T15:57:26+5:30
१५ जुलैपूर्वी इतरांना वेळ : आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या भूसंपादनातील ११५ गटांपैकी २५ गटांतील ६० खातेधारकांना भूसंपादन विभागाकडून ९ कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे. उर्वरित गटातील खातेधारकांना १५ जुलैपूर्वी मोबदला स्वीकारून भूसंपादनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केले. खातेदारांच्या बैठकीत संबंधित गट क्रमांकातील विविध त्रुटी दूर करून खरेदीसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. लवकरच उर्वरित गटातील भूसंपादनाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा करवीरचे प्रांत हरीश धार्मिक यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात भूसंपादन विभागासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीला करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक, भूसंपादनचे अधिकारी विवेक काळे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तेजूसिंग पवार यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी ३१ एकर जागेचे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करून भूसंपादन केले आहे.
उर्वरित ३३ एकरांसाठी पुन्हा खासगी वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यासाठी १५ जुलैपर्यंतची तारीख निश्चित केली असून, त्यानंतर उर्वरित जमिनीचे २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार सक्तीने भूसंपादन केले जाणार आहे. खरेदी थांबलेल्या ११५ गटांपैकी ४५ गटांचे थेट खरेदीचे प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत. सोमवारी २५ गटांतील ६० खातेधारकांना ९ कोटी रुपयांचा मोबदला दिल्यामुळे धावपट्टीच्या भूसंपादनाचा मार्गही मोकळा झाला आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या खरेदीसाठी १५ जुलैपर्यंत संबंधित गटाचे प्रस्ताव तयार झालेले आहेत. त्याच्या खासगी वाटाघाटीसाठी संबंधित गटातील खातेधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली होती. यापूर्वीच्या मोबदल्यासाठी ४० खातेधारक तयार होते त्यानंतर सोमवारी आणखी ६० खातेधारकांनीही मोबदला स्वीकारल्याने आता फक्त २५ गटांतील खातेधारकांची संमती बाकी आहे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल. - हरीश धार्मिक, प्रांताधिकारी, करवीर.