जिल्ह्यात ९ लाख ४५ हजार रोपांची लागवड
By admin | Published: July 8, 2017 12:10 AM2017-07-08T00:10:28+5:302017-07-08T00:10:28+5:30
वनमहोत्सव सप्ताह : प्रभुनाथ शुक्ला यांची माहिती; राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : राज्यात चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात वनमहोत्सव सप्ताहात ९ लाख ४५ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. ही मोहिम प्रभावीपणे हाती घेण्यात आली असून उद्दिष्टाच्या ११३ टक्के काम केल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्ला म्हणाले, यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेस १ जुलै रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. गेली सात दिवस जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम प्रभावीपणे हाती घेण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यास आठ लाख ३८ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली खड्ड्यांचे तसेच रोपे लावण्याचे नियोजन केले होते.
गेल्या आठवडाभरात वन व सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच अन्य सर्व विभागांच्या सहकार्यामुळे आजअखेर ९ लाख ४५ हजार १० झाडे लावण्यात आली आहेत. वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत वनविभाग व इतर विभागाची आॅनलाईन खड्डे नोंदणी ८ लाख ८९ हजार ६१६ इतकी झाली होती; तर ५६ हजार ५२२ खड्ड्यांची आॅफलाईन नोंदणी झाली होती. या खड्ड्यामध्ये १ ते ७ जुलै या कालावधीत वृक्षारोपणासाठी वनविभागाने आवश्यक रोपे उपलब्ध करून दिली. वृक्षारोपण मोहिमेच्या यशस्वितेसाठी वनविभागाने गावपातळीवरही जनजागृती करून सर्व घटकांचा सक्रिय सहभाग घेतला आहे.
रोपखरेदीतून वनविभागाला मिळाले पावणेदोन लाख
कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज, इत्यादी शहरांमध्ये २५ जून ते ५ जुलैपर्यंत प्रत्येकी ४ वनमहोत्सव केंद्रे उभारली होती. त्यामार्फा ५ हजार ५५४ व ६१ संस्थांनी २१ हजार ६३४ रोपे खरेदी केली; त्यामुळे शासनास
१ लाख ८३ हजार १०१ रुपयांचा महसूल मिळाल्याचेही शुक्ला यांनी सांगितले.
४ हजार साईट्सवर ६५ हजार लोकांनी भरली माहिती
वनमहोत्सव सप्ताहात ४ हजार १०२ साईट्सवर ६५ हजार ९७८ लोकांनी ८ लाख ८८ हजार ४८८ इतकी रोपे लावण्याची आॅनलाईन माहिती भरली आहे. तसेच ८५ साईटवर ३ हजार ९९९ लोकांनी ५६ हजार ५२२ इतके वृक्षारोपण केले आहे. यामुळे जिल्ह्यात एकंदर ९ लाख ४५ हजार १० इतकी झाडे लागली गेली.