बिद्री कारखान्याचे ९ लाख मे. टन ऊसगाळप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:16 AM2021-06-29T04:16:42+5:302021-06-29T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ११ लाख टनांवर ऊस उपलब्ध असून, यावर्षी कारखाना ९ लाख ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ११ लाख टनांवर ऊस उपलब्ध असून, यावर्षी कारखाना ९ लाख मे. टन ऊसगाळप करेल, असा आत्मविश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला. आधुनिकीकरणाची सर्व कामे पूर्ण करून येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गळितास सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठीच्या रोलर पूजनप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. याप्रसंगी पाटील यांच्या हस्ते रोलरचे पूजन करून येत्या गळीत हंगामाच्या मशिनरी जोडणीस प्रारंभ करण्यात आला.
अध्यक्ष पुढे म्हणाले, कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या ६ लाख ८० हजार ४२६ मे.टन उसाला एफआरपी रु. ३ हजार ७५ रुपये प्रमाणे २०९ कोटी रुपये संपूर्णपणे अदा केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिटिन ४५०० मे. टनांवरून ७५०० मे. टनांपर्यंत वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कारखान्याच्या पूर्वीच्या जवळपास ७० टक्के जुन्या मशिनरी बदलून नवीन बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प उभारणीदेखाल लवकरच सुरुवात करणार आहोत. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक सर्वश्री ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, के. ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदीप पाटील, जगदीश पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, विकास पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करताना अध्यक्ष के. पी. पाटील, सर्व संचालक व अधिकारी.
छाया - चांदेकर फोटो, बिद्री