गडहिंग्लज तालुक्यातील ९ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:26 AM2021-04-09T04:26:01+5:302021-04-09T04:26:01+5:30
शिवानंद पाटील। गडहिंग्लज गडहिंग्लज : कोरोनाचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी गावोगावी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. तरीही अनेक गावांना कोरोनाचा ...
शिवानंद पाटील। गडहिंग्लज
गडहिंग्लज :
कोरोनाचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी गावोगावी सर्व यंत्रणा सज्ज आहेत. तरीही अनेक गावांना कोरोनाचा शिरकाव टाळता आला नाही. परंतु, गेल्या वर्षभरात गडहिंग्लज तालुक्यातील तब्बल ९ गावांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करून कोरोनाला वेशीवरच रोखले आहे.
कोरोनाला वेशीवरच रोखलेली गावं, लोकसंख्या आणि लॉकडाऊनमध्ये त्या गावात बाहेरून आलेल्यांची संख्या कंसात : नंदनवाड -१४५७ (२१३), कडाल -४५३ (६७), बुगडीकट्टी-२४३६ (२८३), तारेवाडी-६८८ (९३), हेळेवाडी-३६२ (५७), बिद्रेवाडी -९२२ (१३७), हुनगिनहाळ- १२७६ (८२), निलजी-२२४९ (९०), कडलगे -२३४७ (८६)
पुणे, मुंबईसह बाहेरचे ग्रामस्थ गावी आल्यानंतर त्यांच्या संस्थात्मक अलगीकरणाची उत्तम व्यवस्था गावकऱ्यांनी केली. गृहअलगीकरणातील लोकांना घरपोच जीवनोपयोगी वस्तू देण्यात आल्या तर बाहेरून गावात येणाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली.
लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे गावातील वयोवृद्ध, लहान मुले व गर्भवतींसाठी काही गावांनी दवाखान्यात जाण्या-येण्यासाठी, उपचारासाठी स्वतंत्र वाहतुकीची सोय केली.
शासकीय उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य यंत्रणा व ग्रामदक्षता कमिट्यांनी दिवसरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या परिश्रमाला ग्रामस्थांनीही चांगला प्रतिसाद दिला. दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी या गावांनी पुन्हा कंबर कसली आहे.
--
* कमी लोकसंख्या ठरली फायद्याची...!
या गावांची लोकसंख्या अडीच हजारापेक्षा कमी आहे. चार गावात एक हजारांहून कमी तर दोन गावात पाचशेहून कमी लोकवस्ती आहे. कमी लोकसंख्येमुळे परिस्थिती सहजपणे हाताळता येणे शक्य झाले.
एकमेकांची साथ अन् कोरोनावर मात...!
प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्राम दक्षता कमिटी आणि ग्रामस्थांनी सर्व पातळीवर एकमेकांना साथ दिली. कोणतीही अडचण आली तरी एकजुटीने त्यावर तोडगा काढण्यात आला. त्यामुळेच कोरोनावर मात करता आली.
----------------------
* प्रतिक्रिया
शासकीय आदेश व प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली. त्याला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहकार्य केल्यामुळेच हे शक्य झाले.
- प्रमोद जगताप, ग्रामसेवक हुनगिनहाळ, ता. गडहिंग्लज.
----------------------
* प्रमोद जगताप : ०८०४२०२१-गड-०१