Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 12:15 PM2023-04-24T12:15:30+5:302023-04-24T12:15:52+5:30

बोगस मतदानाचा प्रयत्न उघड

91 percent voting for Rajaram Cooperative Sugar Factory, Result tomorrow | Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार

Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार

googlenewsNext

कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी कार्यक्षेत्रातील ५८ केंद्रांवर १३ हजार ५३८ पैकी इर्षेने १२ हजार ३३६ (९१.१२ टक्के) इतके मतदान झाले. टोप (ता. हातकणंगले) येथे येलूर येथील सभासदांवरून कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील व त्यांचे भाचे मुकुंद पाटील यांच्यात खडाजंगी उडाल्याने सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया ठप्प होती. सेंट झेविअर्स येथे संस्था गटातील मतदान केंद्रावर किरकोळ वादावादी झाली. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. उद्या, मंगळवारी मतमोजणी होत आहे.

‘राजाराम’साठी गेले पंधरा ते वीस दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक चांगलीच गाजली. ‘राजाराम’मध्ये सत्तारुढ गटाने दोनशे रुपयांनी दर कमी दिल्याचे सांगत ‘आमचं ठरलंय कांडका पाडायचा’ ही टॅगलाइन घेऊन आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण केले. तर ‘डी. वाय. पाटील’ साखर कारखान्याच्या सभासदांचा मुद्दा उपस्थित करत माजी आमदार महादेवराव महाडिक व अमल महाडिक यांनी विरोधकांची अस्त्रे परतवून लावण्याचा प्रयत्न केला.

या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करवीर, हातकणंगले, पन्हाळा, राधानगरी, गगनबावड्यासह सात तालुक्यांतील मतदान केंद्रांवर इर्षेने ९१.१२ टक्के मतदान झाले. प्रत्येक गावात ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे इर्षा पाहायला मिळाली. प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न दोन्ही आघाड्यांनी केलाच, त्याचबरोबर मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी दिवसभर यंत्रणा सक्रिय होती. या निवडणुकीत दोन्ही गटांकडून साम, दाम, दंड या नीतीचा वापर केल्याने निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संस्था गटात चुरशीने ९९.२२ टक्के मतदान

कारखान्याचे ब वर्ग सभासद १२९ असून, त्यापैकी १२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या गटातून सत्तारुढ आघाडीकडून माजी आमदार महादेवराव महाडिक तर विरोधी आघाडीकडून सचिन पाटील हे रिंगणात असून, येथे दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

टक्का वाढला... धक्का कोणाला...

‘राजाराम’च्या मागील निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत त्यात वाढ होऊन ९१.१२ टक्के मतदान झाले. त्यामुळे मतांच्या वाढलेल्या टक्क्याचा कोणाला धक्का बसणार? याविषयी कमालीची उत्सुकता लागली आहे.

बोगस मतदानाचा प्रयत्न उघड

शिरोली पुलाची मतदान केंद्रावर बनावट आधारकार्ड वापरून मयत सभासदांच्या नावावर मतदान करण्याचा प्रकार विरोधी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. संबंधित व्यक्ती कर्नाटकचा असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा प्रकार समजताच आमदार सतेज पाटील तिथे दाखल झाले.

Web Title: 91 percent voting for Rajaram Cooperative Sugar Factory, Result tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.