६६ उमेदवारांचे ९२ अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:23 AM2019-10-04T00:23:22+5:302019-10-04T00:25:12+5:30
चौथा शनिवार, रविवार, त्यानंतर गांधी जयंती यामुळे तीन दिवस अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवार, गुरुवारी झुंबड उडाली. आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे.
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी ललितपंचमीचा मुहूर्त साधून आमदार, माजी आमदार, माजी मंत्र्यांसह दिग्गजांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. यामध्ये ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे, आमदार हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील, गोपाळराव पाटील, स्वाती कोरी, संग्रामसिंह कुपेकर, आदी दिग्गजांचा समावेश आहे. आज, शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने झुंबड उडणार आहे.
जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ६६ उमेदवारांनी ९२ अर्ज दाखल केले.
चंदगड मतदारसंघातून १३ उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले. यामध्ये संग्रामसिंह कुपेकर (शिवसेना), गोपाळराव पाटील (अपक्ष), स्वाती कोरी (जनता दल (धर्मनिरपेक्ष), अमर चव्हाण (राष्ट्रवादी), शिवाजी पाटील (अपक्ष व भाजप), विद्याधर गुरबे (अपक्ष), गंगाधर व्हसकोटी (वंचित बहुजन आघाडी), सुभाष देसाई (अपक्ष), श्रीकांत कांबळे (बसप), बाळेश बंडू, आदी प्रमुखांनी अर्ज भरले.
राधानगरीमध्ये माजी आमदार के. पी. पाटील (राष्टÑवादी), सत्यजित दिनकरराव जाधव (अपक्ष), अरुण डोंगळे (अपक्ष), शामराव रामराव देसाई (अपक्ष), आदींसह ११ जणांनी १५ अर्ज दाखल केले. कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ (राष्टÑवादी), संजय घाटगे (शिवसेना), समरजित घाटगे (अपक्ष), दयानंद नानासो पाटील (अपक्ष), आदींसह सातजणांनी आठ अर्ज, कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज संजय पाटील (काँग्रेस) यांनी चार अर्ज, करवीरमध्ये राहुल पांडुरंग पाटील (कॉँग्रेस), अरविंद भिवा माने (अपक्ष), शैलाबाई शशिकांत नरके (शिवसेना), डॉ. आनंदा दादू गुरव (वंचित बहुजन आघाडी) यांच्यासह पाचजणांनी नऊ अर्ज; कोल्हापूर उत्तरमधून आमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना), संभाजी साळुंखे (अपक्ष), भरत देवगोंडा पाटील
काँग्रेस आघाडीकडून आतापर्यंत करवीरमधून पी. एन.पाटील, कागलमधून हसन मुश्रीफ, दक्षिणमधून ऋतुराज पाटील, शिरोळमधून सावकर मादनाईक यांनी अर्ज भरले. आज, शुक्रवारी राधानगरीतून के. पी. पाटील, हातकणंगलेतून राजू आवळे, ‘उत्तर’मधून चंद्रकांत पाटील, चंदगडमधून राजेश पाटील, इचलकरंजीतून राहुल खंजिरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महायुतीकडून दक्षिणमधून अमल महाडिक, शाहूवाडीतून सत्यजित पाटील, शिरोळमधून उल्हास पाटील, हातकणंगलेतून सुजित मिणचेकर, ‘उत्तर’मधून राजेश क्षीरसागर, इचलकरंजीतून सुरेश हाळवणकर, चंदगडमधून संग्राम कुपेकर, कागलमधून संजय घाटगे यांनी अर्ज भरले. आज शुक्रवारी राधानगरीतून प्रकाश आबिटकर हे उमेदवारी दाखल करणार आहेत.
‘जनसुराज्य’कडून शाहूवाडीतून विनय कोरे यांनी अर्ज भरला आहे. हातकणंगलेतून अशोकराव माने आज, शुक्रवारी अर्ज दाखल करणार आहेत. अपक्ष म्हणून इचलकरंजीतून प्रकाश आवाडे यांनी अर्ज भरला आहे. आज हातकणंगलेतून ताराराणी पक्षाकडून किरण कांबळे व शिरोळमधून अर्चना संकपाळ अर्ज भरणार आहेत.
भाजपमधून बंडखोरी केलेले राहुल देसाई यांनी राधानगरीतून, तर कागलमधून समरजितसिंह घाटगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले. राधानगरीतून सत्यजित जाधव यांनीही अपक्ष अर्ज भरला. ‘उत्तर’मधून बंडा साळोखे, शिरोळमधून प्रमोद पाटील यांनीही अपक्ष अर्ज भरले आहेत. ‘वंचित’कडून राधानगरीतून जीवन पाटील यांनी अर्ज भरला.
आज शेवटच्या दिवशी उडणार झुंबड
कोल्हापूर : विधानसभेसाठी अर्ज भरण्याचा आज, शुक्रवारचा शेवटचा मुहूर्त साधण्यासाठी दिग्गजांची झुंबड उडणार आहे. यात करवीरमधून चंद्रदीप नरके, राधानगरीतून प्रकाश आबिटकर, के. पी. पाटील, हातकणंगलेतून राजू आवळे, अशोकराव माने, ‘कोल्हापूर उत्तर’मधून चंद्रकांत जाधव व वसंतराव मुळीक, चंदगडमधून राजेश पाटील यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
अर्ज भरण्यासाठी २७ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असली तरी पितृपक्ष आणि आघाडी-युतीच्या घोळामुळे प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागला आहे. त्यातच चौथा शनिवार, रविवार, त्यानंतर गांधी जयंती यामुळे तीन दिवस अर्ज भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे मंगळवार, गुरुवारी झुंबड उडाली. आज शेवटचा दिवस असल्याने गर्दी होणार आहे.