रंकाळा तटबंदीसाठी ९३ लाख

By admin | Published: March 27, 2015 12:24 AM2015-03-27T00:24:03+5:302015-03-27T00:29:20+5:30

‘स्थायी’चा निर्णय : निधीची प्रथमच तरतूद; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणार

93 lakhs for the Rangala fort | रंकाळा तटबंदीसाठी ९३ लाख

रंकाळा तटबंदीसाठी ९३ लाख

Next

कोल्हापूर : रंकाळ्याच्या पश्चिम बाजूने कोसळणाऱ्या तटबंदीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी ९३ लाखांची तरतूद करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सदस्य सचिन चव्हाण यांनी दिली. कामाची निविदा मंजूर केली असून, भिंतीची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याची सक्त सूचना प्रशासनास दिल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
वर्षापूर्वी रंकाळ्याच्या ढासळलेल्या तटबंदीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, निधीअभावी हे काम रेंगाळले. त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांत तब्बल ४० फुटांपेक्षा अधिक तटबंदी कोसळली. याप्रकरणी सामाजिक संघटना, माध्यमातून आवाज उठल्यानंतर स्थायी समिती व महापालिका सभेत तातडीने काम करण्याच्या घोषणा झाल्या. प्रत्यक्षात एक रुपयाचीही अद्याप तरतूद झालेली नव्हती.
दरम्यान, रंकाळ्याची तटबंदी ढासळण्याची मालिका सुरूच राहिल्याने प्रशासनाबाबत प्रचंड संताप व्यक्त होत होता. रंकाळ्याची पश्चिम बाजूची संपूर्ण तटबंदीच नाहीशी होण्याच्या मार्गावर असल्याने जोरदार टीका होऊ लागल्यानंतर प्रशासनास जाग आली. त्यामुळे ‘स्थायी’ने पैशाची जोडणी करून तातडीने निविदा मंजूर केली आहे. लवकरच तटबंदीच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
रंकाळ्याच्या पश्चिम बाजूची ९० मीटरची तटबंदी कोणत्याही वेळी ढासळू शकते. ही संपूर्ण तटबंदी काढून कॉँक्रीटची भक्कम भिंत उभारावी, त्यापुढे जुन्या ‘अल्सर’ पद्धतीने उतरंडीसारखी दगडी भिंत उभारावी, शेजारील झाडांची मुळे व भुसभुशीत जमीन यांमुळे भिंत बांधताना विशेष काळजी घ्यावी, झाडांच्या मुळांचा धोका भिंतीला होऊ नये, यासाठी कॉँक्रीटची भक्कम भिंत बांधावी, त्यापुढे दगडी भिंत उभारावी, ही भिंत धरणाच्या सांडव्याप्रमाणे उतरती असावी, जेणेकरून ती पाण्याचा दाब सहन करील, अशा सूचना इंजिनिअर्स अ‍ॅँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. याची अंमलबजावणी करण्याची मागणी रंकाळाप्रेमींतून होत आहे. (प्रतिनिधी)
४रंकाळा प्रदूषणमुक्तीसंदर्भात कोणत्या उपाययोजना केल्या आहे अथवा प्रस्तावित आहेत यासंबंधी तपशीलवार प्रतिज्ञापत्र येत्या एक महिन्यात सादर करा, असे आदेश गुरुवारी राष्ट्रीय हरित लवादाचे न्या. व्ही. आर. किनगावकर व अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास दिले. पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.
४रंकाळा प्रदूषणप्रश्नी येथील नागरिक सुनील केंबळे यांनी अ‍ॅड. वल्लरी जठार यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर लवादाने हा आदेश दिला.
४शहराचे ऐतिहासिक वैभव असलेला रंकाळा तलाव मरणासन्न अवस्थेत असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे रंकाळ्याला मरणकळा आल्या आहेत. रंकाळ्यासभोवती असलेल्या गृहसंकुल प्रकल्पातून रंकाळ्यात सांडपाणी मिसळते त्याठिकाणी सांडपाण्याची ड्रेनेजची सोय नाही, असा दावा याचिकेत केला.
४उच्च न्यायालयात पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात जी जनहित याचिका चालू आहे, त्यामध्ये रंकाळा तलावाचा समावेश आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली. त्यावर महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयातील जनहित याचिका ही फक्त पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात असून, त्यामध्ये रंकाळा तलावाचा समावेश नसल्याचे सांगितले.

Web Title: 93 lakhs for the Rangala fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.