‘गोकुळ’साठी ९६० तरुण मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:35+5:302021-03-14T04:21:35+5:30
राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मतदार यादीत ३६५० पैकी तब्बल ...
राजाराम लोंढे,
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) मतदार यादीत ३६५० पैकी तब्बल ९६० संस्था प्रतिनिधी हे चाळिशीच्या आतील आहेत. संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे नातू सत्यशील संदीप नरके व विश्वास नारायण पाटील यांचे नातू पार्थ सुनील पाटील हे सर्वात तरुण सभासद असून त्यांचे वय १९ वर्षे आहे. संचालकांनी स्वत:च्या नावाबरोबरच पत्नी, मुलगा, सुना, पुतणे व नातवांच्या नावावरही ठराव केले आहेत.
‘गोकुळ‘ दूध संघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यातील अनेक वैशिष्ट्ये समोर येत आहेत. मागील निवडणुकीत दमछाक झाल्याने यावेळेला सत्तारूढ गटाने ठराव करताना सावध भूमिका घेतली आहे. आपल्या घरातील अथवा जवळच्या व्यक्तीच्या नावावर ठराव केले आहेत. विद्यमान संचालक, त्यांच्या पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांचा भरणा दिसत आहे. त्यामुळेच १९ ते ४० वयोगटातील तब्बल ९६० ठरावधारक आहेत.
दूध संस्थांच्या कारभारावर अध्यक्षांची पकड असल्याने ‘लाख’मोलाचा ठराव त्यांच्याच नावावर असतो. मात्र ३६५० पैकी केवळ १४९९ ठराव हे अध्यक्षांच्या नावावर आहेत. तब्बल ९०९ ठराव हे सभासदांच्या नावावर असून ८४२ ठराव संस्था संचालकांच्या नावावर आहेत. तरी त्यांच्यापेक्षा संस्था सभासद व संचालक मंडळाच्या नावावर अधिक ठराव असल्याचे मतदार यादीवरून स्पष्ट झाले आहे.
काही तरुण ठरावधारक...
ठरावधारक संस्था वय
सत्यशील संदीप नरके महादेव, घोटवडे १९
पार्थ सुनील पाटील विश्वासराव पाटील, केकतवाडी १९
राजवर्धन महेश आरेकर-पाटील बिरदेव, आरे (धनगरवाडी) २०
श्रृती सुनील पाटील महादेव, घानवडे २०
कांचन आनंदा घोलराखे धनलक्ष्मी, भडगाव २२
प्रियांका साताप्पा नरके शिवसाईबाबा, चंद्रेश्वरवाडी २३
रोहीत धनाजी घाटगे कलमदेव, पिलावरवाडी २३
प्रमिला कल्लाप्पा पाटील जिजामाता, मलतवाडी(चंद्रे) २३
नरेंद्र मारुती पाटील जोतिर्लिंग, उपवडे २३
अक्षय विलास पाटील नागेश्वर, पाल बुद्रुक २४
विरेंद्र संजय मंडलिक महात्मा फुले, चिमगाव २५
उपाध्यक्ष पद शोभेचेच ठरले
सहकारी संस्थेत अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. उपाध्यक्ष पद हे राजकीय सोयीसाठी निर्माण केले आहे. त्यामुळे कामकाजात उपाध्यक्षांना संचालकांपेक्षा वेगळे अधिकार नसतात. ठरावांमध्ये केवळ १२८ उपाध्यक्षांच्या नावावर ठराव असल्याने संस्थात्मक पातळीवर उपाध्यक्षांना काय महत्त्व आहे, हे अधोरेखित होते.
नरके, मुश्रीफ कुटुंबियांच्या नावावर सर्वाधिक ठराव
‘गोकुळ’चे संचालक व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ठरावांची संख्या अधिक आहे. अरुण नरके यांच्या स्वत:च्या नावाबरोबरच संदीप, चेतन, जयश्री संदीप नरके, स्निग्धा चेतन नरके, सत्यशील संदीप नरके, अजित नरके व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावावर दोन, असे आठ ठराव आहेत, तर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व नविद मुश्रीफ यांच्या नावावर आठ ठराव आहेत.
महाडिक, ‘पी. एन.’ यांच्या नावावर ठराव नाहीत
‘गोकुळ’चे नेतृत्व करणारे आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांच्या नावावर ठराव नाहीत. मागील निवडणुकीत महाडिक यांच्या नावावर शिरोली येथील दूध संस्थेचा ठराव होता. मात्र यावेळेला दोन्ही नेत्यांच्या नावावर ठराव नाही. उलट, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह आजी-माजी आमदारांच्या नावावर ठराव आहेत.