बेफिकीर वागणाऱ्या ९७ नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:23 AM2021-04-24T04:23:19+5:302021-04-24T04:23:19+5:30
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, काळजी घ्या, मास्क वापरा, असे महानगरपालिका प्रशासन वारंवार सांगत आहे. तरीही नागरिक बेफिकीरपणे ...
कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, काळजी घ्या, मास्क वापरा, असे महानगरपालिका प्रशासन वारंवार सांगत आहे. तरीही नागरिक बेफिकीरपणे वागत आहेत. आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबीयांनाही धोका निर्माण करीत आहेत. महापालिका प्रशासनाने अशा बेफिकीर ९७ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली.
नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी फिरताना नाकाला मास्क लावणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाकडून तशा वारंवार सूचना दिल्याही जातात. चौकाचौकांत पथके ठेवण्यात आली आहेत. तरीही नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. आधी शंभर रुपये दंड होता, सहज भरत होते. त्यामुळे दंडाची रक्कम ५०० रुपये केली आहे. तरीही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत.
महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकांकडून ९७ लोकांकडून ५२ हजार ५०० रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला. पथकाकडून ९१ विनामास्क लोकांकडून ४५ हजार ५००, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने सहा नागरिकांकडून ७००० रुपये असा दंड वसूल केला.
शहरात सकाळच्या वेळी गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट या ठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा; तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.