जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 11:16 AM2022-01-06T11:16:52+5:302022-01-06T11:17:47+5:30

उद्या, शुक्रवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार.

98 Percentage votes for Kolhapur District Central Co operative Bank | जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

जिल्हा बँकेसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी बुधवारी ७६५१ पैकी ७४९८ (९८ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १५ जागांसाठी विविध गटांतून ३३ उमेदवार रिंगणात होते, त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. भुदरगडमध्ये तालुक्यात सर्वाधिक ९९.८२ टक्के मतदान झाले. उद्या, शुक्रवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

विकास संस्था गटातील करवीर, कागल, चंदगड, राधानगरी, हातकणंगले, गगनबावडा तालुक्यात बिनविरोध निवड झाल्या. इतर तालुक्यांतील सहा आणि इतर गटांतील नऊ अशा १५ जागांसाठी ही निवडणूक झाली. यामध्ये शाहूवाडी विकास संस्था गटात तिरंगी तर पतसंस्था गटात चौरंगी व उर्वरित गटांत दुरंगी लढत झाली.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ४० केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान झाले. सकाळी संथगतीने मतदान झाले, दहापर्यंत २१ टक्के मतदान झाले होते. सकाळी अकरानंतर मतदानाला गती आली, दुपारी बारापर्यंत ५३.३१ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७६५१ पैकी ७४९८ मतदान झाले.

मतदानापर्यंत आबीटकरांना व्हाइस कॉल

प्रचारासाठी उमेदवारांनी वेगवेगळे फंडे वापरले होते. यामध्ये एसएमस, थेट फोन करणे, व्हाइस कॉल आदी प्रणालींचा वापर केला. अर्जुन आबीटकर यांचे बुधवारी मतदान संपेपर्यंत व्हाइस कॉल येत होते.

पन्हाळ्यात नरकेंचा कोरेंना पाठिंबा

पन्हाळ्यात ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी आमदार विनय काेरे यांना पाठिंबा दिला. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरकेंसह आमदार कोरे उपस्थित होते.

क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात

एका मतदाराला स्वत:च्या गटासह राखीव पाच असे सहा मतदान करावे लागत होते. त्यामुळे सहा शिक्के मारून मतदार लगेच बाहेर येणे अपेक्षित होते. मात्र, बहुतांश मतदार हे मतदान केंद्रात रेंगाळताना दिसले, यावरून क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसते.

मंडलिकांनी १० तर मुश्रीफांचे ८ मतदान

बँकेसाठी खासदार संजय मंडलिक यांनी विविध गटांत दहा मतदान केले. विकास संस्था एक, प्रक्रिया गटात सहा, इतर संस्था गटात तीन मतदान केले. यामुळे मंडलिक यांच्या हाताची सर्वच्या सर्व बोटे शाईने रंगली होती. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आठ मतदान केले.

चंद्रदीप नरके केंद्रावर तळ ठाेकून

माजी आमदार चंद्रदीप नरके हे कोल्हापूर शहरातील केंद्रावर सकाळपासूनच तळ ठाेकून होते. त्यांच्या सोबत उमेदवार रविंद्र मडके, संपतराव पवार, अजित पाटील, एस. आर. पाटील, राजेंद्र दिवसे आदी उपस्थित होते.

गवळी दाम्पत्याचे शेवटपर्यंत प्रयत्न

सत्तारुढ आघाडीकडून मतदारांच्या स्वागतासाठी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, उमेदवार भै्या माने, प्रदीप पाटील, युवराज पाटील, स्मिता गवळी होते. दुपारनंतर यातील बहुतांश गेले तरी स्मिता गवळी व त्यांचे पती युवराज गवळी शेवटपर्यंत मतदारांच्या स्वागतासाठी केंद्रावर होते.

‘पी. एन.-नरके’ आमने सामने

मतदान केंद्रावर आमदार पी. एन. पाटील व चंद्रदीप नरके हे आमने सामने आले. यावेळी दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. या दोन नेत्यांच्या मध्ये खासदार संजय मंडलिक होते. त्यानंतर पाटील हे मतदान करण्यासाठी गेले.

खेळीमेळीत मतदान प्रक्रिया

निवडणुकीत चुरस असली तरी मतदान मात्र शांततेत पार पडले. मतदान केंद्रावर नेत्यांसह कार्यकर्ते एकमेकांशी खेळीमेळीत होते. त्यामुळे केंद्रावर कोणत्याही प्रकारचा तणाव दिसत नव्हता.

तालुकानिहाय झालेले मतदान असे-

तालुका झालेले मतदान टक्केवारी

हातकणंगले ९८० ९६.६४

करवीर ९७४ ९६.१३

कोल्हापूर शहर ३७० ९४.८७

कागल ८३५ ९९.७६

पन्हाळा ८५८ ९८.३९

राधानगरी ६८५ ९८.४१

शाहूवाडी २७१ ९७.८३

शिरोळ ५५१ ९९.२७

आजरा ३४४ ९८.८५

भुदरगड ५७३ ९९.८२

चंदगड ४५५ ९९.३४

गडहिंग्लज ४६७ ९८.७३

गगनबावडा १३६ ९७.१४

Web Title: 98 Percentage votes for Kolhapur District Central Co operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.