कोल्हापुरात उतरले १४६ आसनी मोठे विमान, विमानतळाच्या इतिहासातील पहिली घटना
By संतोष.मिठारी | Updated: November 22, 2022 18:43 IST2022-11-22T16:57:25+5:302022-11-22T18:43:09+5:30
नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान विमानतळावर उतरले

कोल्हापुरात उतरले १४६ आसनी मोठे विमान, विमानतळाच्या इतिहासातील पहिली घटना
कोल्हापूर : येथील विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज, मंगळवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी १४६ आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूरविमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले.
स्टार उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या उद्योगक्षेत्रातील कामानिमित्त हे मोठे विमान कोल्हापुरात आले. एमब्ररर ई१९५-ई२ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान १४६ आसनी आहे. त्यात प्रवासी नव्हते. दुपारी साडेचारच्या सुमारास या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. त्यामुळे एअरबस सारखी विमाने कोल्हापुरात उतरण्यास आणि येथून उड्डाण करण्यास येथील धावपट्टी योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे.
दरम्यान, यापूर्वी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंदिया हे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते एम्ब्रेर लेगसी ६५० या जेट इंजिन असलेल्या विमानाने आले होते. कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्षमतेचे विमान उतरले होते.
कोल्हापूर विमानतळावरून दि. १३ नोव्हेंबर रोजी यशस्वीपणे तिरूपतीला जाणाऱ्या विमानाचे रात्रीच्यावेळी उड्डाण झाले. त्यानंतर आज १४६ आसनांचे एअरबसला समकक्ष असणारे विमान उतरले. त्यावर आता विमानतळाची धावपट्टी अशी मोठी विमाने उतरण्यास योग्य, पूरक आणि विमानतळावरील सुविधा सक्षम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. -अनिल शिंदे, संचालक, कोल्हापूर विमानतळ