२१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 12:08 PM2022-10-08T12:08:50+5:302022-10-08T12:11:28+5:30

श्रेया हिने सुरू केलेल्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम होत आहे. पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढला आहे. मुले मोकळेपणाने बोलत आहेत.

A 21 year old girl from Kolhapur Shreya Milind Desai is spreading awareness by going to schools and giving lessons on Good Touch, Bad Touch | २१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे

२१ वर्षीय श्रेया शाळांमध्ये जाऊन देते ‘गुड टच, बॅड टच’चे धडे

Next

संतोष मिठारी

कोल्हापूर: ‘शरीर जे मागणी करतंय, ते कसंही पुरवायचं आणि त्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा’, अशी वृत्ती समाजात फोफावत आहे. त्यातून नात्यातील, ओळखीतील व्यक्तींकडून बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. ज्या लहान मुला-मुलींना ‘नकोसा’ अनुभव आला आहे. त्यांना मानसिक धक्का बसतो आणि त्याचे दुष्परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतात. असा अत्याचार टाळण्यासाठी या मुला-मुलींना एखादा स्पर्श चांगला की, वाईट ओळखता यायला हवा हे महत्त्वाचे आहे. त्याची गरज ओळखून कोल्हापुरातील २१ वर्षीय युवती श्रेया मिलिंद देसाई ही गेल्या दोन वर्षांपासून शाळा-शाळांमध्ये जाऊन ‘गुड टच, बॅड टच’चे धडे देत जनजागृती करत आहे. तिने आतापर्यंत ६५० जणांचे प्रबोधन केले आहे.

शहरातील टाकाळा परिसरात राहणारी श्रेया ही केआयटी महाविद्यालयात बी. टेक. अंतिम वर्षात शिकत आहे. तिचे वडील किर्लोस्कर ऑइल इंजिन विभागाचे सरव्यवस्थापक, तर आई वृषाली या छत्रपती शाहू विद्यालयात शिक्षिका आहेत. कोरोनाकाळात शालेय विद्यार्थी, लहान मुले-मुली घरात होते. त्या दरम्यान यातील काहींना नकोसा अनुभव आल्याचे प्रकार उघडकीस आले. त्यावर शालेय मुले-मुलींमध्ये स्पर्शज्ञानाबाबत जनजागृती करण्याचा विचार तिच्या मनात आला आणि तिने आई-वडील, मित्र-मैत्रिणींसमोर तो मांडला. त्यांचे पाठबळ मिळताच तिने ‘यु आर नॉट अलोन’ या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली. त्याव्दारे प्रत्यक्ष आणि ऑनलाइन स्वरूपात शाळांमध्ये जाऊन ‘गुड टच, बॅड टच’चे धडे देणे सुरू केले.

शरीराची माहिती, एखादा स्पर्श कसा ओळखायचा, ‘नकोसा’ अनुभव आला, तर त्याची माहिती आई-वडील, शिक्षकांना कशी द्यायची, असा प्रसंग ओढवल्यास त्याला कसा विरोध करायचा, आदींबाबत लघुनाटिका, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येऊ लागले. अत्याचाराचा अनुभव आलेल्यांचे तज्ज्ञांद्वारे समुपदेशन करण्यात आले. श्रेया हिने सुरू केलेल्या मोहिमेचा सकारात्मक परिणाम होत आहे. पालक आणि मुलांमध्ये संवाद वाढला आहे. मुले मोकळेपणाने बोलत आहेत.

तिला या मोहिमेची व्याप्ती वाढवायची आहे. त्यासाठी संस्थेचे ट्रस्टमध्ये रूपांतर करून पुढील पाऊले ती टाकणार आहे. सामाजिक क्षेत्राबरोबर ती एनसीसीमध्येही आहे. यावर्षीच्या दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनामध्ये ती सहभागी झाली होती. तिला गायनाची आवड असून तिने शास्त्रीय गायनाचे शिक्षणही घेतले आहे. जनजागृतीच्या माध्यमातून बालशोषण आणि अत्याचार रोखण्यासाठी धडपडणाऱ्या श्रेया हिचे कार्य आदर्शवत ठरणारे आहे.

बालकांचे आयुष्य सुरक्षित राहावे. ते लैंगिक शोषण, अत्याचाराला बळी पडू नयेत या उद्देशाने ‘गुड टच, बॅड टच’ मोहीम हाती घेतली. त्यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मित्र-मैत्रिणी, तज्ज्ञांची मदत मिळाली. या मोहिमेतून पालक-मुलांमधील संवाद वाढत आहे. मुले-मुली निर्भय होत आहेत. त्याचे समाधान आहे. मुले-मुली एकटे नाहीत याची जाणीव आम्ही त्यांना या मोहिमेद्वारे करून देत आहोत. या मोहिमेची व्याप्ती वाढविणार आहे. - श्रेया देसाई

Web Title: A 21 year old girl from Kolhapur Shreya Milind Desai is spreading awareness by going to schools and giving lessons on Good Touch, Bad Touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.