बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:13 PM2022-10-24T12:13:34+5:302022-10-24T12:14:01+5:30

गेले पाच दिवस शिरवली (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथून बेपत्ता झालेली ७३ वर्षीय वृद्ध कोल्हापुरात आढळल्याने नातेवाईक आनंदले.

A 73 year old woman who went missing from Shirvali Devgad Sindhudurg for the past five days was found in Kolhapur. | बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा

बाबा सापडले..! नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू, सीसीटीव्ही कॅमेरामुळे लागला सुगावा

googlenewsNext

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर शोधून पालथं घातलं, स्टँड, स्टेशन, मंदिर, मंडप... पण बाबा कुठंच दिसले नाहीत. अखेरचा प्रयत्न म्हणून जड पावलांनी घाबरतच सीपीआर रुग्णालय गाठलं, सर्व इमारतीच्या वॉर्डांत नजर भिरभिरली. आवारातच बाबासारखी व्यक्ती पोलिसाचा आधार घेत अपघात विभागाकडे जाताना दिसली. अन् शोधकार्यातील नातेवाइकांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बाबा सापडले! गेले पाच दिवस शिरवली (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथून बेपत्ता झालेली ७३ वर्षीय वृद्ध कोल्हापुरात आढळल्याने नातेवाईक आनंदले.

देवगड तालुक्यातील ७३ माजी शिक्षक गेल्या मंगळवारपासून (दि. १८) अचानक बेपत्ता झाले. नातेवाइकांनी शोधमोहीम राबवली. वेंगुर्ला ते पुणे एस.टी. बसमध्ये तळेरे येथे दुपारी सव्वाबाराला बसून गेल्याचा सीसीटीव्ही कॅमेरामुळे सुगावा लागला. वर्णनावरून वाहकाने संबंधित व्यक्तीला कोल्हापुरात सोडल्याची माहिती दिली. त्यानुसार बेपत्ता वृद्धाचे फोटो कोल्हापुरात सोशल मीडियावर व्हायरल केले.

बेपत्ता वृद्धाच्या पोलीस पाटील पुत्राने मित्रांसह गेले पाच दिवस-रात्र कोल्हापूरचे रेल्वेस्टेशन, बस स्टँड, श्री अंबाबाई मंदिर, रंकाळा स्टँड, भवानी मंडप येथे शोधमोहीम राबवली. दरम्यान, संबंधित वृद्ध चार दिवस कोल्हापुरात फिरत राहिले. रात्री दुकानाच्या दारांचा आसरा घेतला. भुकेने व्याकूळ होऊन मंगळवार पेठेतील मंगेशकरनगर रस्त्याकडेला पडल्याचे तरुणाला आढळले. त्याने १०८ रुग्णवाहिकेला बोलावून सीपीआर रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वृद्धाची परिस्थिती पाहता त्यांना पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी राजेंद्र संसूरकर व कृष्णा काकडे यांनी त्यांना धीर देत खाऊ घातले.

शोधकार्यातील त्यांचे नातेवाईक अखेरचा प्रयत्न म्हणून सीपीआर रुग्णालयात आले. तेथेही सर्व इमारतीच्या पायऱ्या चढ-उतार करत वॉर्डातील रुग्णांकडे चौकशी केली; पण निराशजनक माहिती मिळाली. अखेर हताश होऊन नातेवाईक खिडकीजवळ थांबले असता त्यांना एक पोलीस कर्मचारी हे बाबांच्या हाताला धरून अपघात विभागाकडे येताना दिसले. त्यावेळी शोधकार्यातील पोलीसपुत्र व नातेवाईक आनंदले. पाच दिवसांच्या शोधमोहिमेचा अखेर गोड झाला. नातेवाइकांनी पोलीस कर्मचारी राजेंद्र सोनसूरकर व कृष्णा कांबळे या दोघांचे आभार मानले.

Web Title: A 73 year old woman who went missing from Shirvali Devgad Sindhudurg for the past five days was found in Kolhapur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.