कोल्हापुरकरांचा नादच खुळा! मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवरून मिरवणूक काढत केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 02:33 PM2023-05-27T14:33:46+5:302023-05-27T14:34:57+5:30
मुलगी जन्माला आली की त्या मुलीचे स्वागत अनेकजण मोठ्या उत्साहात करत असतात.
ज्योती पाटील
पाचगाव: मुलगी जन्माला आली की त्या मुलीचे स्वागत अनेकजण मोठ्या उत्साहात करत असतात. सध्या कोल्हापुरात मुलीचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे. या स्वागताची चर्चा जोरदार सुरू आहे. चक्क हत्तीवरुन मिरवणूक काढत मुलीचे स्वागत केले आहे. या स्वागताची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
मूळचे म्हाकावे ता.कागल सध्या राहणार पाचगाव त.करवीर येथील गिरीष बाळासाहेब पाटील यांना तब्बल आठ वर्षांनंतर मुलगी झाली. म्हणून त्यांनी चक्क मुलीचे स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढून व मोठ्या दिमाखात केले. तसेच यावेळी वेगवेगळे कार्यक्रमही घेण्यात आले. त्यामुळे आनंदित झालेल्या पाटील कुटुंबीयांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटून तिचे घरी स्वागत केले. रंगीबेरंगी फुग्यांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या घरात रांगोळीचा सडा व फुलांच्या पायघड्यांमध्ये आपल्या लाडक्या ईरा या लेकीचा गृहप्रवेश मोठ्या आनंदात साजरा केला.
गिरीष पाटील सध्या पुणे येथे आय टी कंपनीत कामाला असून त्यांच्या पत्नी सुधा चांगल्या शिकलेल्या आहेत. एकीकडे नकोशी म्हणून झिडकरणाऱ्या स्त्री जन्माचे थाटात स्वागत करून पाटील कुटुंबाने एक आदर्श घालून दिला आहे. पाचगाव येथील गिरीष व मनीषा या दांपत्याला कन्यारत्न झाले. त्यांच्या कुटुंबात सुमारे ३५ वर्षांनंतर मुलगी जन्माला आली. त्यामुळे आनंदी झालेल्या पाटील कुटुंबाने तिच्या आगमनाचे स्वागत व तिचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत केला. तिचे ईरा असे नामकरण करण्यात आले. जन्मानंतर मामाच्या गावावरून पहिल्यांदाच आपल्या घरी आलेल्या ईरा व तिच्या आईचे स्वागत सनईच्या सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत झाले.
या मिरवणुकीत त्यांचे अख्खे कुटुंब,सर्व सगेसोयरे, भाऊबंद व परिसरातील महिला नटूनथटून सहभागी झाल्या होत्या. सर्वच महिला फुगड्या खेळल्या. मुलीच्या स्वागतासाठी घराबाहेर रंगीबेरंगी फुग्यांची मोठी कमान उभारली होती. पाळण्यासह घर व परिसर आकर्षक फुलांनी सजवला होता. स्त्रीच्या जन्माने नाकतोंड मुरडणाऱ्या मानसिकतेच्या युगात मुलीच्या जन्माचे वाजतगाजत केलेले स्वागत व थाटामाटातील गृहप्रवेशाबाबत पाटील कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आमच्या घरात ३५ वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे. सर्व कुटुंब खूप आनंदी आहे. या आनंदात नातीचे स्वागत केले. मुलगा- मुलगी एक समान आहेत. स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाकडून व्हायला पाहिजे. स्त्रीभ्रूणहत्या पाप आहे. हे पाप व्हायला नको, यासाठी जागृती झाली पाहिजे.
- आनंदी पाटील, मुलीची आजी