कोल्हापुरात फुटपाथवर आढळला रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह, घातपात की अपघात?; तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 12:08 IST2025-04-05T12:08:23+5:302025-04-05T12:08:44+5:30
कोल्हापूर : आपटेनगर चौकातील फुटपाथवर गुरुवारी सायंकाळी प्रकाश जयवंतराव दळवी (वय ४५, रा. सासणेनगर, संभाजीनगर, कोल्हापूर ) यांचा रक्तबंबाळ ...

कोल्हापुरात फुटपाथवर आढळला रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह, घातपात की अपघात?; तपास सुरु
कोल्हापूर : आपटेनगर चौकातील फुटपाथवर गुरुवारी सायंकाळी प्रकाश जयवंतराव दळवी (वय ४५, रा. सासणेनगर, संभाजीनगर, कोल्हापूर) यांचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने, रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सीपीआरमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांच्याकडील दुचाकी आणि मोबाइल चोरीस गेल्याने बुधवारी रात्रीच्या सुमारास त्यांचा घातपात झाला, की अपघातामुळे त्यांचा मृत्यू असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवीन वाशी नाका म्हणजेच आपटेनगर चौकाजवळच्या फुटपाथवर गुरुवारी (दि. ३) सायंकाळी प्रकाश दळवी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा आढळला. स्थानिक व्यावसायिकांनी करवीर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.
बुधवारी सायंकाळी कामावरून आल्यानंतर काही वेळाने त्याने आई लक्ष्मीबाई दळवी आणि भाऊ संदीप दळवी या दोघांना बाहेर फिरायला जातो, असे सांगून दुचाकी ते निघाले. बुधवारी रात्री ते घरी परतले नव्हते. त्यांचा भाऊ संदीप दळवी हे जुना राजवाडा पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले होते. दरम्यान, करवीर पोलिसांनी त्यांना संपर्क केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या मृत्यूचा तपास पोलिस करीत आहेत.