किल्ल्यावर आकाशकंदील लावताना शॉक बसून मुलाचा मृत्यू, कोल्हापुरात घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 05:49 PM2024-10-25T17:49:00+5:302024-10-25T17:49:34+5:30
दिवाळीच्या तोंडावर झेंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
कोल्हापूर : अंगणात तयार केलेल्या किल्ल्याची शोभा वाढविण्यासाठी लायटिंगची माळ आणि आकाशकंदिल लावताना शॉक बसल्याने वेदांत सुधीर झेंडे (वय १२, रा. कणेरकर नगर, कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दिवाळीच्या तोंडावर वेदांत याचा चटका लावणारा मृत्यू झाल्याने झेंडे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
सीपीआरच्या अपघात विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, कणेरकर नगर येथील सुधीर झेंडे हे बंगळुरू येथील एका कंपनीत मॅनेजरपदी नोकरी करतात. त्यांची पत्नी, दोन मुले आणि आई कणेरकर नगरातील घरात राहतात. त्यांचा मोठा मुलगा वेदांत याने अंगणात किल्ला तयार केला आहे. गुरुवारी सायंकाळी तो किल्ल्यावर लायटिंगची माळ आणि आकाशकंदिल लावत होता.
त्यावेळी लायटिंगच्या माळेतून त्याला शॉक बसला. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यांनी वेदांत याच्या आईला बोलवून विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. त्यानंतर तातडीने वेदांत याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. सीपीआरमध्ये दाखल करताच उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.
हसता-खेळता मुलगा क्षणात दगावला!
नोकरीनिमित्त बंगळुरू येथे असलेले सुधीर झेंडे यांना दुर्घटनेची माहिती दिली असून, ते कोल्हापूरला येण्यासाठी निघाले. हसता-खेळता मुलगा काही क्षणात दगावल्याने वेदांत याच्या आईला धक्का बसला. त्यांच्या नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.