कारवाई टाळण्यासाठी घेतली दहा हजारांची लाच, कोल्हापुरात जीएसटी विभागातील कर निरीक्षक अटकेत
By उद्धव गोडसे | Published: September 5, 2023 05:40 PM2023-09-05T17:40:48+5:302023-09-05T17:42:32+5:30
कोल्हापूर : जीएसटीची रक्कम मुदतीत भरली नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम परिसरातील व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची ...
कोल्हापूर : जीएसटीची रक्कम मुदतीत भरली नसल्याने होणारी कारवाई टाळण्यासाठी कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम परिसरातील व्यावसायिकाकडून दहा हजार रुपयांची लाच घेणारा जीएसटी विभागातील कर निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. विशाल बाबू हापटे (वय ३५, रा. हातकणंगले) असे अटकेतील संशयित कर निरीक्षकाचे नाव आहे. कसबा बावडा येथील जीएसटी भवनमध्ये मंगळवारी (दि. ५) दुपारी ही कारवाई झाली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉकी स्टेडियम परिसरातील टायर विक्रेत्याकडून जीएसटीची रक्कम भरणे प्रलंबित होते. याबद्दल कारवाई करण्याचे टाळण्यासाठी जीएसटी विभागातील कर निरीक्षक विशाल हापटे याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर पथकाने मंगळवारी दुपारी जीएसटी भवान येथे सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारताना हापटे याला पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली. अटकेतील हापटे याची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.