रस्त्यात अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर लावला लग्नाचा बायोडेटा, नवरदेवाची अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 04:49 PM2024-12-10T16:49:38+5:302024-12-10T16:58:20+5:30
गारगोटी : लग्नासाठी वधू मिळत नसल्याने एका इच्छुक वराने आपला बायोडेटा (वैयक्तिक माहिती) रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर लावला ...
गारगोटी : लग्नासाठी वधू मिळत नसल्याने एका इच्छुक वराने आपला बायोडेटा (वैयक्तिक माहिती) रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर लावला आहे. एजंटांची अवाच्या सव्वा फी ऐकून त्याने ही अनोखी शक्कल लढविली आहे. मुलींच्या घटलेल्या संख्येने आता उग्र रूप धारण केले आहे. परिणामी, उपवर तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे अवघड झाले आहे. मुलींचे प्रमाण वाढविणे काळाची गरज आहे. अन्यथा सामाजिक समतोल बिघडून अनेकांना विनालग्नाचे राहावे लागणार आहे. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करण्यासाठी एखादे प्रभावी अभियान सुरू करावे. जेणेकरून तो मैलाचा दगड ठरावा!
सध्याच्या कालखंडात लग्न ठरविणे अवघड काम झाले आहे. अनेक वधू-वर सूचक मंडळांना बायोडेटा पाठवूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच एका इच्छुक नवरदेवाने चक्क रस्त्यात शहरांचे अंतर दर्शविणाऱ्या मैलाच्या दगडावर ठिकठिकाणी स्वतःचा बायोडेटा लावला आहे. त्यामुळे लग्न जुळण्यासाठी नामी शक्कल लढविणाऱ्या इच्छुक नवरदेवाची चर्चा चांगलीच रंगली आहे.
उच्चशिक्षित, नोकरदार, त्याची कौटुंबिक परिस्थिती चांगली असतानाही त्याला लग्न ठरविताना चांगलीच कसरत करावी लागते. लग्न जुळविण्यासाठी तो वधू-वर सूचक मंडळात अनेक चकरा मारतो. सोशल मीडियावरील अनेक संकेतस्थळांवर आपला बायोडेटा पाठवून बरेच दिवस त्या संकेतस्थळावरून प्रतिसाद येईल काय याची वाट पाहत असतो. या सगळ्या गोष्टी करूनही लग्न जुळत नसल्याने अनेक जण लग्नाच्या विवंचनेत आहेत.
एका इच्छुक नवरदेवाने चक्क गारगोटी कोल्हापूर रस्त्यावरील कूर या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील अंतर दर्शविणाऱ्या दगडावरच आपल्या संपूर्ण माहितीचा बायोडेटा चिकटवला आहे. त्यामध्ये पुणे येथील कंपनीत इंजिनीअर म्हणून कार्यरत, वार्षिक पगार ८ लाखांचा, पुणे येथे टू-बीएचके फ्लॅट, वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आणि ‘वधू’संबंधीच्या अपेक्षा या सर्व बाबींचा उल्लेख केला आहे. शिवाय संपर्कासाठी आपला मोबाइल नंबरही दिला आहे.