Kolhapur: 'पंचगंगे'वरील शिरोली येथील ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 04:36 PM2023-12-26T16:36:43+5:302023-12-26T16:38:50+5:30

२००४ नंतर वाहतूक पूर्णत: बंद

A British-era iron bridge at Shiroli on the Panchganga river built 133 years ago, was demolished | Kolhapur: 'पंचगंगे'वरील शिरोली येथील ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

Kolhapur: 'पंचगंगे'वरील शिरोली येथील ब्रिटिशकालीन पूल इतिहासजमा

सतीश पाटील

शिरोली : शिरोली पंचगंगा नदीवरील १३३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन लोखंडी पूल पाडण्यात आला असून, हा पूल आता इतिहासजमा झाला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असून, हा पूल उतरवण्याचे काम आजपासून सुरू आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहे.

लंडनमधील वेस्टवूड बॅली अँड कंपनीने १८९० पूर्वी हा पूल उभा केला होता. या पुलाच्या उभारणीनंतरच शिरोली गावाला ‘पुलाची शिरोली’ अशी नवीन ओळख मिळत गेली. वस्तू, माल आणि यंत्रसामग्री यांची नदीपात्रावरील वाहतूक सोयीची व्हावी, यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लंडन येथील प्रसिद्ध वेस्टवूड बॅली अँड कंपनीला पूल उभारण्याचे काॅन्ट्रॅक्ट दिले. नदीपात्रात सात दगडी पिलर बांधून त्यावर लोखंडी पूल उभारण्यात आला होता.

पुलाची वाहतूक क्षमता आणि किती वर्षांसाठीचा वापर, हे निश्चित करूनच त्याची उभारणी झाली. त्यामुळे सुमारे दीड ते दोन हजार मेट्रिक टन लोखंड या पुलासाठी वापरले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. पुलाच्या पश्चिमेस असणाऱ्या लोखंडी गार्डवर वेस्टवूड बॅली अँड कंपनी, इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर पोपलार लंडन यांच्या खुणा आजही जशाच्या तशा आहेत.

शंभर वर्षे कोल्हापूरकरांना सेवा दिल्यानंतर तीस वर्षांपूर्वी या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद केली होती. त्याही अगोदर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात या लोखंडी पुलाच्या पूर्वेस नवा पूल बांधण्यात आला. त्यामुळे लोखंडी पुलावरील वाहतूक आपोआप कमी झाली होती; पण १९९०च्या दशकात या पुलावरून दुचाकी व तीनचाकी हलकी वाहने रहदारी करत होती.

२००४ नंतर वाहतूक पूर्णत: बंद

महामार्गाच्या चौपदरीकरणात २००४ मध्ये पंचगंगा नदीवर आणखीन एक पूल बांधण्यात आला आणि लोखंडी पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद झाली. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. याच ठिकाणी कोल्हापूर शहराच्या प्रवेशासाठी बास्केट ब्रिज मंजूर आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक पूल होणार आहेत. परिणामी, हा लोखंडी पूल उतरवण्याचे काम सुरू आहे.

'पुलाची शिरोली' नाव

पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथे पंचगंगा नदीवर १८९० पूर्वी हा पूल उभा केला होता. या पुलाच्या उभारणीनंतरच शिरोली गावाला पुलाची शिरोली अशी नवीन ओळख मिळत गेली.

Web Title: A British-era iron bridge at Shiroli on the Panchganga river built 133 years ago, was demolished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.