कोल्हापुरात उच्चभ्रू वस्तीत सुरु होता वेश्या अड्डा, पोलिसांनी सर्व्हेच्या बहाण्याने छापा टाकून केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 05:41 PM2022-12-07T17:41:03+5:302022-12-07T17:41:24+5:30
एका पीडित महिलेची केली सुटका
कोल्हापूर : उच्चभ्रू वस्ती असलेल्या ताराबाई पार्कातील फाळके कंपाउंड येथील मनीष पार्कमध्ये वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी (दि. ५) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत वेश्या व्यवसाय चालवणारे गौतम संजय धामेजा (वय २१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गांधीनगर, ता. करवीर) आणि खुशबू सादिक खाटिक (वय ३६, रा. कदमवाडी, कोल्हापूर) या दोघांना अटक करण्यात आली, तर पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. सहायक पोलिस निरीक्षक श्रद्दा आंबले-बरगे यांनी सर्व्हे करण्याच्या बहाण्याने रो हाउसमध्ये प्रवेश करून वेश्या अड्ड्यावर कारवाई केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई पार्क परिसरात एका रो हाउसमध्ये वेश्या अड्डा सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांच्या पथकाने वेश्या अड्डा सुरू असलेल्या रो हाउसचा शोध सुरू केला. सर्व्हे करण्याच्या बहाण्याने त्यांनी फाळके कंपाउंडमधील मनीष पार्क येथील रो हाउसमध्ये प्रवेश केला. वेश्या अड्डा सुरू असल्याचे लक्षात येताच आंबले यांच्यासह पथकाने कारवाई केली.
दोघांना अटक
गहाणवट घर घेऊन वेश्या अड्डा चालवणारे गौतम धामेजा आणि खुशबू खाटिक या दोघांना पोलिसांनी अटक केली, तर एका पीडित महिलेची सुटका केली. अटकेतील संशयितांचे मोबाईल आणि रो हाउसमधील साहित्य असा सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. धामेजा आणि खाटिक या दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.