Kolhapur: सीआयडी हवालदाराने १ कोटी लांबविले, कारचालकासह लुटीचा बनाव केला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 12:51 PM2024-10-21T12:51:09+5:302024-10-21T12:53:41+5:30

कारचालकास भुईंज पोलिसांकडून अटक, रक्कम ताराबाई पार्कातील व्यावसायिकाची

A businessman in Kolhapur was robbed of one crore rupees by a CID constable along with a car driver | Kolhapur: सीआयडी हवालदाराने १ कोटी लांबविले, कारचालकासह लुटीचा बनाव केला

Kolhapur: सीआयडी हवालदाराने १ कोटी लांबविले, कारचालकासह लुटीचा बनाव केला

कोल्हापूर : व्यावसायिकाची १ कोटी ४० लाखांची रक्कम पुण्यातून कारमधून घेऊन येताना मौजे पाचवड (ता. वाई, जि. सातारा) येथे महामार्गावर अज्ञातांनी लुटल्याचा बनाव कारचालक आणि त्याच्या सीआयडीमधील पोलिस हवालदार मित्राने केला. मात्र, अवघ्या तीन तासांत भुईंज पोलिसांनी कारचालकाचा बनाव उघडकीस आणला.

चालक नीलेश शिवाजी पाटील (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, पाचगाव) याला अटक केली असून, त्याचा साथीदार कोल्हापूर सीआयडीमधील हवालदार अभिजीत शिवाजीराव यादव (रा. पिरवाडी, ता. करवीर) हा रक्कम घेऊन पसार झाला. बुधवारी (दि. १६) मध्यरात्री हा प्रकार घडला.

भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील ताराबाई पार्क येथील मोबाइल आणि नॉव्हेल्टी व्यावसायिक मनोज मोहन वाधवानी (वय ४२) यांची व्यवसायातील रक्कम पुण्यातून आणायची होती. त्यासाठी बदली कारचालक नीलेश पाटील याला वाधवानी यांनी बुधवारी सायंकाळी पुण्याला पाठवले होते. रक्कम घेऊन परत येताना मध्यरात्री एकच्या सुमारास चालक पाटील याने वाधवानी यांना फोन केला. ‘पोलिसांची गाडी माझा पाठलाग करीत आहे. काय करू?’ अशी विचारणा त्याने केली.

‘गाडी बाजूला घेऊन पोलिसांशी बोल’, असे वाधवानी यांनी चालकाला सांगितले. पुन्हा १५ मिनिटांनी चालकाचा फोन आला. ‘घाबरल्यामुळे मी गाडी सोडून पळून गेलो. थोड्या वेळाने परत आल्यानंतर पाहिले, तर कारमधील १ कोटी ४० लाखांची रक्कम लंपास झाली होती’, अशी माहिती त्याने वाधवानी यांना दिली.

लुटीच्या प्रकाराची शंका आल्याने चालकाला जवळच्या पोलिस ठाण्यात जायला सांगून वाधवानी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मावसभावासह भुईंज पोलिस ठाण्यात पोहोचले. चालक लुटीची घटना रंगवून सांगत होता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने मित्राकडे रक्कम देऊन लुटीचा बनाव केल्याची कबुली दिली. वाधवानी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

सीआयडीमध्ये खळबळ

कारचालक पाटील याचा मित्र हवालदार अभिजीत यादव हा कोल्हापूर येथील सीआयडी कार्यालयात कार्यरत आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत यादव कार्यालयात होता. लुटीच्या गुन्ह्यात त्याचा समावेश असल्याची माहिती मिळताच सीआयडी कार्यालयात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला कार्यमुक्त केले. सध्या तो पसार असून, भुईंज पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

हवालदार यादव याला बोलवून घेतले

पुण्यात रक्कम मिळताच चालक पाटील याने सीआयडीमधील मित्र हवालदार अभिजीत यादव याला फोन करून बोलवून घेतले. पाचवडजवळ दोघांची भेट झाली. चालकाने पैशांची पिशवी मित्राकडे दिली आणि वाधवानी यांना फोन करून लुटीचा बनाव केला.

घाबरल्यामुळे दरवाजा अनलॉक

पाठलाग सुरू झाल्यानंतर घाबरल्याने कार सर्व्हिस रोडला लावून एक ते दीड किलोमीटर दूर पळून गेलो. घाईगडबडीत दरवाजा लॉक करायचा राहिला. काही वेळाने परत आलो, तर अज्ञातांनी रक्कम गायब केली होती, असा बनाव चालकाने रचला होता.

Web Title: A businessman in Kolhapur was robbed of one crore rupees by a CID constable along with a car driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.