..अन् विसावा पॉईंटवरून कार ४०० फूट खोल दरीत कोसळली, महिला डॉक्टरसह बालकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 02:09 PM2022-03-11T14:09:43+5:302022-03-11T18:06:46+5:30
पार्क करीत असताना कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली.
आंबा : आंबा घाटातील विसावा पॉईंटवरून कार चारशे फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात डॉ. सृष्टी संतोष हारपुडे (वय ३२) सृष्टी हारपुडे व मुलगा शिवांश (वय ३, रा. गुलबर्गा) याचा मृत्यू झाला. तर डॉ दीप्ती फुलारे (३५), आज्ञा संगमेश संतोष हारपुडे (७), चालक संतोष हारपुडे, रियांश प्रणव सुभेदार (५) मनाली हारपुडे, प्रताप तंबाखे (७०) हे जखमी आहेत. दुपारी दीड वाजता हा अपघात झाला. याची देवरुख पोलीस ठाण्यात नोंद झाली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गुलबर्गा येथील हारपुडे कुटुंब सांगली विश्रामबाग येथील नातलग डॉ. संगमेश फुलारे यांच्याकडे आले होते. गुरुवारी सकाळी डॉ. फुलारे व हारपुडे कुटुंब जाकादेवी येथील नातेवाईक पुजारी यांच्याकडे निघाले होते. घाट उतरत असताना विसावा पाईंटवर फुलोरे कुटुंब थांबले. संतोष हारपुडे हे कार (नं. - के. ए ३२झेड ०९४९) पार्क करीत असताना कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली.
यामध्ये सृष्टी, शिवांश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होत जागीच मृत्यू झाला. डॉ. दीप्ती फुलोरे या गंभीर जखमी झाल्या. जखमींना कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. सृष्टी हारपुडे व शिवांश यांचे मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. अधिक तपास देवरुखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी. एस.आय. विद्या पाटील तपास करीत आहेत.
सुदैवाने ते बचावले
हारपुडे यांची गाडी पार्क न होताच दरीत कोसळत असल्याचे दिसताच डॉ. संगमेश फुलारे यांनी गाडी थांबवण्यास आडवे झाले. पण गाडी दरीत कोसळली. फुलारे यांनी गाडी पकडतच दरीत झेप घेतली. सुदैवाने ते बचावले. त्यांच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या आहेत