Kolhapur: विनापरवानगी दुचाकी रॅली मनसेला भोवली, पदाधिका-यांसह ३०० जणांवर गुन्हा दाखल
By उद्धव गोडसे | Published: January 29, 2024 11:55 AM2024-01-29T11:55:15+5:302024-01-29T11:55:49+5:30
कोल्हापूर : मनसेच्या पदाधिकारी निवडी झाल्यानंतर रविवारी (दि. २८) दुपारी उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता शहरातून दुचाकी रॅली ...
कोल्हापूर : मनसेच्या पदाधिकारी निवडी झाल्यानंतर रविवारी (दि. २८) दुपारी उत्साही कार्यकर्त्यांनी पोलिसांची परवानगी न घेता शहरातून दुचाकी रॅली काढली. याबाबत शाहूपुरी पोलिसांनीमनसेचे नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, उत्तर विभागातील जिल्हाध्यक्ष नीलेश धुमा, दक्षिण विभागातील जिल्हाध्यक्ष राजू पाटील आणि करवीर मतदार संघाचे अध्यक्ष अमित पाटील यांच्यासह ३०० जणांवर गुन्हा दाखल केला.
मनसेच्या नवीन पदाधिकारी निवडी रविवारी दुपारी पार पडल्या. याचा आनंद साजरा करण्यासाठी नूतन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील ताराराणी चौकातून दुचाकी रॅली काढली. स्टेशन रोडमार्गे शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीत सुमारे ३०० जणांचा सहभाग होता. विनापरवानगी दुचाकी रॅली काढून वाहतुकीला अडथळा करू नये, अशी सूचना शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी मनसेच्या पदाधिका-यांना केली होती.
मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पदाधिका-यांनी रॅली काढली. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेदरकारपणे दुचाकी चालवल्याबद्दल आणि वाहतूक खोळंबा केल्याबद्दल पोलिसांनी मनसेच्या पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती निरीक्षक सिंदकर यांनी दिली.