Kolhapur: सीपीआरमधील ५ कोटींची खरेदी; ठेकेदार लिंबेकरवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 16:47 IST2025-04-18T16:46:07+5:302025-04-18T16:47:49+5:30

‘लोकमत’ने प्रकरण आणले होते उघडकीस; मुर्दाड शासन यंत्रणेला आली जाग

A case has been registered against Mayur Vasant Limbekar a contractor who supplied surgical supplies worth Rs 5 crore to CPR on the basis of bogus documents | Kolhapur: सीपीआरमधील ५ कोटींची खरेदी; ठेकेदार लिंबेकरवर गुन्हा दाखल

Kolhapur: सीपीआरमधील ५ कोटींची खरेदी; ठेकेदार लिंबेकरवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : बोगस कागदपत्रांच्या आधारे सीपीआरला ४ कोटी ८७ लाख रुपयांच्या सर्जिकल साहित्य पुरवठा करणारा ठेकेदार मयूर वसंत लिंबेकर (रा. गणपती मंदिरजवळ, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर) यांच्याविरोधात गुरुवारी (दि. १७) रात्री अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. मुर्दाड शासन यंत्रणा हा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत होती. परंतु ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरल्याने अखेर हा गुन्हा दाखल झाला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. लिंबेकर यांनी ठेका मिळवण्यासाठी मुलुंड येथील ईएसआयएस हॉस्पिटलचे बनावट दरकरार पत्र सादर केले. तसेच कोलोप्लास्ट कंपनीचे तारीख नमूद नसलेले बनावट शिक्का व सही असलेले विलिंगनेस लेटर आणि याच कंपनीचे बनावट सही, शिक्क्याचे बनावट प्राधिकृत पत्र सादर करून हा ठेका मिळवला होता.

त्यानुसार ४ कोटी ८७ लाख ३० हजार ५०० रुपयांचे स्ट्रराइल ड्रेसिंग पॅड हे साहित्य पुरवठा करण्यात आले. या बनावट कागदपत्रांबद्दल त्याच्याविरोधात ही फिर्याद देण्यात आली असून, शासनाच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक केसरकर पालकमंत्री असताना हा खरेदीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यावेळी राहुल रेखावार जिल्हाधिकारी होते, तर डॉ. प्रवीण दीक्षित हे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता होते. आता केवळ ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या साखळीत सहभागी असणाऱ्यांचे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अशी झाली खरेदी प्रक्रिया

  • ऑक्टोबर २०२२ला अशा पद्धतीचे साहित्य खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
  • यासाठी एकूण १२ कोटी १९ लाख रुपयांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला.
  • डिसेंबर २०२२ला हा प्रस्तावाला तांत्रिक मान्यता मिळाली.
  • डिसेंबर २०२२, जानेवारी २३ आणि फेब्रुवारी २३ रोजी जिल्हा नियोजनकडून प्रशासकीय मान्यता.
  • याच दरम्यान सीपीआरला साहित्य पुरवठा
  • या ठेकेदाराला १४ फेब्रुवारी २०२३ला सर्व बिल अदा.


असे आले प्रकरण उघडकीस
या ठेक्याबाबत माहिती अधिकारामध्ये मुलुंड रुग्णालयाला पत्र लिहिण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून अशा कोणत्याही प्रकारचे दरपत्रक नमूद तारखेस देण्यात आले नसल्याचे लेखी देण्यात आले आणि इथूनच हा घोटाळा उघडकीस आला.

१८,१९, २०,२१ जुलै रोजी चार भागांची मालिका लिहून ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणले.
याची दखल घेत चौकशी समितीची वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा.
चौकशी समितीकडून गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब, उच्चस्तरीय चौकशीची शिफारस.
पुन्हा ‘लोकमत’कडून मंत्र्यांना विचारणा
गुन्हा दाखल करण्याची हसन मुश्रीफ यांच्याकडून घोषणा
टाळाटाळ करत करत अखेर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल

नेत्यांशी लागेबांधे

हा ठेका मिळवण्यासाठी आमदारांचे पत्र घेणे, गैरकारभार उघडकीस आला तरी मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर फलकांद्वारे शुभेच्छा देणे, यासाठी युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्याचे सहकार्य घेऊन त्यावर खासदार, आमदार यांची छायाचित्रे वापरणे आणि या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न लिंबेकर याने केला. परंतु तरीही अखेर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

Web Title: A case has been registered against Mayur Vasant Limbekar a contractor who supplied surgical supplies worth Rs 5 crore to CPR on the basis of bogus documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.