कोल्हापुरातील कळंबा कारागृहाचे पेट्रोल पंपासह श्रृंखला उपहारगृह सुरू होणार
By सचिन यादव | Updated: March 22, 2025 12:27 IST2025-03-22T12:26:55+5:302025-03-22T12:27:27+5:30
तीन महिन्यांत उभारणी : केरळच्या धर्तीवर उपहारगृह साकारणार

कोल्हापुरातील कळंबा कारागृहाचे पेट्रोल पंपासह श्रृंखला उपहारगृह सुरू होणार
सचिन यादव
कोल्हापूर : कोल्हापूरचे कळंबा मध्यवर्ती कारागृह आता विविध सुविधांसाठी अद्ययावत होत आहे. केरळ कारागृहाच्या धर्तीवर श्रृंखला उपहारगृह, कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी स्वतंत्र इमारत, नातेवाईकांच्या ई- मुलाखतीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्स खोलीची स्वतंत्र व्यवस्था होणार आहे. त्यासह कारागृहाच्या पेट्रोल पंपाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. येत्या तीन महिन्यांत हे चार नवे प्रकल्प सुरू होत आहेत. सध्याच्या कारागृहाच्या समोर सुरू असलेल्या सर्व्हिसिंग सेंटर जवळील परिसरात या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गृह विभागाने राज्यातील कारागृहात पेट्रोल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कळंबा मध्यवर्ती कारागृहाने पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. या पंपासाठी मंजुरी मिळाली आहे. आवश्यक त्या एनओसी मिळाल्यानंतर मे महिन्यात हा पंप सुरू होण्याची शक्यता आहे. भारत पेट्रोलियम कंपनीचा हा पंप असून त्यासाठी कारागृह प्रशासनाकडून दहा कैद्यांची निवड करण्याचे काम सुरू असून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हे कैदी खुल्या कारागृहातील असतील. त्यांना तुरुंग प्रशासनाच्या नियमांनुसार वेतन दिले जाईल.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देशातील अनेक राज्यातील कारागृहात ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सिस्टीम’ सुरु झाली. कळंबा कारागृहातही सध्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर करण्यात येते. आता त्यासाठी स्वतंत्र व्हिडीओ कॉन्फरन्स विभाग केला जाणार आहे. त्यामध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठीसाठीही ई-मुलाखतीची व्यवस्था केली जाणार आहे.
केरळच्या धर्तीवर उपहारगृहाची सुरुवात होत आहे. श्रृंखला उपहारगृह असे त्याला नाव दिले आहे. सुमारे दोन गुंठे जागेत हे उपहारगृह सुरू होत आहे. त्यासाठी खुल्या कारागृहातील २० कैद्यांची निवड केली आहे. कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठीही स्वतंत्र इमारत असेल. त्यात लाकडी वस्तू, शिवणकाम, कपडे, रुमाल आदी वस्तूची विक्री केली जाणार आहे.
७०० सीसीटीव्ही कॅमेरे, १०० हॉटस्पॉट
कैद्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण कारागृह परिसरात ७०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोबाइल जामरही बसविले आहेत. कैद्यांना गरम जेवण देण्यासाठी १०० हॉटस्पॉटचा प्रस्तावही मंजूर झाला आहे.
श्रृंखला उपहारगृह, व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा येत्या दोन महिन्यांत सुरु होतील. कारागृहाच्या पेट्रोल पंपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ना हरकत दाखलेही लवकरच मिळतील. - नागनाथ सावंत, वरिष्ठ अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह कोल्हापूर.